पुसेगाव : गेल्या ६७ वर्षांपासून पुसेगाव येथे भरविण्यात येणाऱ्या श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेत यावर्षी पहिल्यांदाच न्यायालयीन निकालामुळे बैलगाड्यांच्या शर्यतीची परंपरा खंडित झाली. मुळातच शेतकऱ्यांची यात्रा म्हणून महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या या यात्रेचे मुख्य आकर्षण बैलगाड्यांच्या शर्यती असतात. यंदा शर्यती न झाल्याने अबालवृध्दांसह शौकीनांची यामुळे फार मोठी निराशा तर झालीच पण शर्यती पाहण्यासाठी मुंबई-पुण्यापासून जिल्ह्यातील हजाारोंच्या संख्येने पुसेगावात येणारी मंडळी यावर्षी आली नाही. त्यामुळे बाजारपेठ व दुकानदार व्यावसायिकांचे लाखो रूपायांचे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील यात्रांचा अविभाज्य अंग असलेल्या या बैलगाड्यांच्या शर्यतींचा बाज काही निराळाच असतो. पुसेगावच्या बैलगाडी शर्यतीत एक नंबरचे बक्षीस पटकाविणाऱ्या बैलजोडीला राज्यात मोठा मान तर मिळतोच पण त्या बैलजोडीची किंंमत ही चांगलीच वधारली जाते. त्यामुळे बैलगाड्यांच्या क्षेत्रातील मंडळी म्हणून तर पुसेगावच्या शर्यतीची वर्षभर वाट पहात असतात. पण दुर्दैवाने यावर्षी या परंपरेत खंड पडला. न्यायालयाच्या धास्तीने शर्यती होणार का नाही यासाठी शहरातील मंडळी मोबाईलवरून ग्रामस्थांच्या सतत संपर्कात होती. भागातील कित्येक शौकीन मंडळी तर शर्यती होणारच या आशेने सकाळ पासूनच पुसेगावात आली होती. पण त्यांचीही घोर निराशा झाली. या शर्यती पाहण्यासाठी कल्याण, डोंबीवली, पनवेल, पुणे,सांगली, तासगाव, पन्हाळा, कोल्हापूर तसेच सातारा, कोरेगाव, कऱ्हाड, फलटण या भागातील सुमारे ६० हजारांच्या आसपास बैलगाड्यांचे शौकीन पुसेगावात हजेरी लावतात. त्यामुळे त्या दिवशी नकळतच लाखो रूपायांची उलाढाल यात्रेत होऊन जात असते. या आखाड्यातील पहिला नंबर मिळवण्यासाठी बैलगाडींचे मालक कित्येक दिवस अहोरात्र मेहनत घेत असतात. (वार्ताहर) शौकिनांना रुखरुख...बैलांच्या व बैलगाड्यांच्या संबंधित व्यावसायिकांना बैलगाड्यांच्या शर्यती न झाल्याने मोठे नुकसान सहन करावे लागले. यावर्षी शर्यती न झाल्याने बैलगाडी शौकीनांसह भागातील लहानांपासून वयोवृध्द माणसांपर्यंत प्रत्येक व्यक्तीला रुखरुख लागल्याचे जाणवत होते.
६७ वर्षांची बैलगाडी शर्यतीची परंपरा खंडित
By admin | Published: December 18, 2014 9:35 PM