मलटण : शेतकरी आणि बैल यांच्यातील नातं कष्टाचं असतं तसंच ते प्रेमाचंही असतं. आपल्या धन्याबरोबर वर्षभर काबाडकष्ट केल्यानंतर एक दिवस सुखाचा असावा, असं सर्वांनाच वाटतं. कष्टकरी ऊर्जेचा मुख्य स्रोत असलेल्या बैलांसाठी आजचा दिवस खूपच सन्मानाचा असतो. नांदल (ता. फलटण) येथील गावकऱ्यांनी पारंपरिक बेंदूर साजरा केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सणासाठी काही बंधने असली तरी उत्साह तोच होता.
नांदल व परिसरातील शेतकरी सकाळी लवकर बैलांना स्वच्छ आंघोळ घालतात, त्यांनतर तेल व हळद घालून खांद मळणी करतात. शिंगांना हिंगुळ लावून शिंब्या लावल्या जातात. नवीन झूल घातली जाते, बैलांना सुरेख रंगवलेही जाते. गावातील भैरवनाथ मंदिरासमोर एकत्र जमून दिमाखात मिरवणूकही काढली जाते. आज इतक्या वर्षांनंतरही नांदल गावाने ही परंपरा जपत बैलांची मिरवणूक काढली. कोरोनाच्या नियमांचे पालन करत लाडक्या सर्जा-राजासाठी सनई व हलगीच्या निनादात मंदिर प्रदक्षिणा घातली जाते. नांदलचा बेंदूर आजही पारंपरिक बाज जपून आहे.