आॅनलाईन लोकमतखंडाळा : भारत हा शेतीप्रधान देश मानला जातो. शेतीच्या जुन्या पारंपरिक रितींना फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सध्या वाढत असल्याचे पाहायला मिळते. असे असतानाही सध्या खंडाळा तालुक्यात सुगीच्या दिवसात काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीनेच ज्वारीची काढणी आणि मळणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून गहू पिकाची काढणी चालू असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेती क्षेत्रात पारंपरिक आणि आधुनिकीकरणाचा दुहेरी संगम पाहायला मिळत आहे.
खंडाळा तालुक्यात रब्बी हंगामाची सुगी जोरात सुरू आहे. रानावनात ज्वारीची काढणी झाल्यावर मळणी केली जात आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र कमी आहे. ते आजही जुन्याच पद्धतीने मळणी, पाखडणी करताना दिसत आहेत. निवडक धान्य पोत्यात भरून ठेवले जात आहे. तर दुसरीकडे आधुनिक यंत्राच्या साह्याने गव्हाची काढणी आणि मळणी एकाचवेळी होऊन तयार धान्य मिळविण्याची पद्धत हल्ली मोठे शेतकरी वापरत आहेत.
कमी वेळेत अधिक क्षेत्रातील पिकांची काढणी होणे त्यामुळे सोपे झाले आहे. यामुळे यांत्रिक खर्च जास्त होत असला तरी शेतकऱ्यांना कमी त्रास होत आहे. शिवाय मजुरांना शोधण्याचेही कष्ट पडत नाहीत. त्यामुळे पिकांच्या काढणीच्या जुन्या रिती आणि आधुनिक पद्धती यांचा अनुभव सध्या अनुभवास येत आहे. (प्रतिनिधी)
शेतीसाठी आधुनिक पद्धतीचा वापर सर्वांनाच शक्य होत नाही. कमी क्षेत्र असणारे आमच्यासारखे शेतकरी आजही जुन्याच पद्धतीचा अवलंब करतात. कमी क्षेत्रासाठी अधिकचा खर्च परवडणारा नसतो.- शेखर खंडागळे, शेतकरी