मायणी : महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री यशवंतबाबा महाराज यांची वार्षिक रथोत्सव यात्रा उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता मायणी अर्बन बँकेचे चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य व ट्रस्टी सुरेंद्र गुदगे यांच्या हस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्या शोभना गुदगे, सभापती संदीप मांडवे, पंचायत समिति सदस्य हिराचंद पवार, सुधाकर कुबेर, सरपंच प्रकाश कणसे, यात्रा कमिटीचे सभासद यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतबाबा महाराजांच्या वार्षिक रथोत्सवास सुरुवात झाली.यशवंतबाबा महाराज यांची प्रतिमा फुलांनी सजविलेल्या रथामध्ये बसविण्यात आली होती. ह्ययशवंतबाबा महाराज की जयह्णच्या जयघोषात व हजारो भाविक,भक्तांच्या उपस्थितीत रथोत्सव यात्रेस सुरुवात झाली. या रथासमोर बाबांची पालखी, गजी, ढोल-ताशा या सर्वांनी संगीताचे सादरीकरण केले. रथ मंदिरापासून बसस्थानक परिसर, नाथ मंदिर, चावडी चौक, उभी पेठ, नवी पेठ, मुख्य बाजार पेठेतून मराठी शाळा, फुलेनगर मार्गेचांदणी चौक, वडूज रोड, यात्रा परिसर, कचरेवाडी, इंदिरानगर मार्गे रात्री मंदिरामध्ये पोहोचला.
शुक्रवारी दिवसभर रथ मार्गावर मेवा-मिठाई व लहान मुलांच्या खेळण्याची दुकाने थाटण्यात आली होती. भाविक-भक्तांनी दहा रुपयांपासून ते एकहजार रुपयांच्या माळा रथावर अर्पण केल्या. रथ मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मायणी पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यंदाच्या यात्रेवर नोटाबंदीचे व दुष्काळाचे सावट जाणवले. (वार्ताहर)