तुळसण ते शिंदेवाडी-कोळेवाडी रस्त्यावरून वांग खोरे व ढेबेवाडी खोरे दक्षिण मांड विभागाला अत्यंत जवळच्या रस्त्याने जोडले गेले आहे. या रस्त्यावरून रयत सहकारी साखर कारखान्याला ढेबेवाडी, कोळेसह पाटण विभागातून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक केली जाते. याशिवाय शिंदेवाडी-तुळसण खिंडीत मोठ्या प्रमाणात दगड खाणी व क्रशर असल्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात दगड व खडीची वाहतूक होते. उंडाळे, ढेबेवाडी, पाटण, इस्लामपूर, शेडगेवाडी या विभागात ही वाहतूक केली जाते. त्यामुळे या रस्त्यावर मोठी रहदारी असते. सातत्याने अवजड वाहने जाऊन या रस्त्याच्या साईडपट्ट्या पूर्णत: खचलेल्या आहेत. जीव मुठीत धरून या मार्गाने सध्या प्रवास करावा लागत आहे. साईडपट्ट्यांची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करून दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
- चौकट
दुचाकीस्वारांची होतेय कसरत
अनेक ठिकाणी तर साईडपट्ट्या खचल्यामुळे डांबरी रस्ताही खचत चालला असून साईडपट्ट्या व डांबरी रस्त्यावरून उतरायचे झाल्यास वाहन वर घेताना चालकांची कसरत होते. याशिवाय दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वाराला साईडपट्टीवरून मुख्य रस्त्यावर यायचे असल्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.