लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सव्वा लाख सातारकरांचे डेस्टिनेशन म्हणून ओळखली जाणारी राजवाड्यावरील चौपाटी काळाचा ओघात अधिकच चौपट होत चालली आहे. या ठिकाणाहून जाणाºया नागरिकांची आणि वाहनांची कशी ससेहोलपट होतेय, या संदर्भात ‘लोकमत टीम’ने शनिवारी सायंकाळी पाच ते साडेसातपर्यंत चौपाटीवर थांबून अवलोकन केले. त्यावेळी टीमला अत्यंत चित्र-विचित्र घटना पाहायला मिळाल्या.ऐतिहासिक राजवाड्यासमोर गेल्या कित्येक वर्षांपासून ही चौपाटी भरत आहे. साताºयाची लोकसंख्या सव्वा लाखाहून अधिक झाली तरी चौपाटीचा मात्र विकास झालाच नाही. आहे त्याच जागेत दिवसागणिक विक्रेत्यांची संख्या वाढूनही चौपाटी मात्र या गर्तेत उभीच आहे.चौपाटीवर सायंकाळी साडेपाच वाजता हळूहळू खवय्यांची गर्दी होऊ लागली होती. यामध्ये विशेषत: महिला आणि लहान मुलांचा भरणा अधिकच जास्त होता. आईच्या हाताला घट्ट धरून चिमुकले गर्दीतून कसे-बसे वाट काढत चौपाटीकडे मार्गस्थ होत होते. मध्येच कोणी तरी ओरडून ‘ऐ बाजूला व्हा,’ असे सांगत होतं. पाठीमागून रिक्षाचा हॉर्न आणि दुचाकीस्वारासोबत विक्रेत्याची बाचाबाची. नेमका काय प्रकार झालाय, हे पाहण्यासाठी आम्ही पुढे सरसावलो असता, ‘हे नित्याचेच प्रकार असून, आम्ही पोटापाण्यासाठी इथं रोज दुकान लावतोय; मात्र मोटारसायकलवाले गर्दीत गाडी घालतायेत,’ असा आरोप त्या विक्रेत्याचा होता.चौपाटीवर सायंकाळी सहानंतर प्रचंड गर्दी होऊ लागली. चौपाटीच्या दोन्ही बाजूंनी खवय्ये विक्री करणारे उभे होते. त्यातच एका विक्रेत्याकडून गरम तेलाची कडई खाली कोसळली. मात्र, सुदैवाने तेथे उभ्या असलेल्या महिला आणि लहान मुलांना काहीही झाले नाही. काय झालंय, हे पाण्यासाठी अनेकजण पुढे आले. त्याचवेळी जलमंदिराच्या बाजूने एसटी आली. या एसटीने चक्काजामच केले. चालकाला दोन मिनिटे काही सुधारेनासे झाले होते. एक चळवळीतील कार्यकर्ता पुढे होऊन वाहतूक सुरळीत करू लागला.एसटीची पण हीच वेळ का?राजवाडा चौपाटीवर सायंकाळच्या सुमारास खवय्यांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे या ठिकाणाहून वाहनांची रहदारी कमी होण्याऐवजी वाढतच असते. शाहूपुरीकडे जाण्यासाठी नागरिकांना हाच रस्ता आहे. त्यातच सायंकाळच्या सुमारास एसटीची वेळही याच मार्गावरून आहे. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास तरी या ठिकाणी वाहनांना प्रवेश बंदी करावी, अशी मागणी येथील व्यावसायिकांची आहे. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत आहे. याकडे पालिकेने लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही विक्रेत्यांनी व्यक्त केली.धोक्याची रपेट!राजवाडा चौपाटीवर चिमुकल्यांची सैर करण्यासाठी तीन घोडे आहेत. गोलबागेला वळसा घालून आणण्यासाठी घोडामालकाला काही पैसे मिळतात; मात्र गोलबागेजवळून घोडा चालवत असताना वाहनांचीही तेथून ये-जा असते. घोडा आणि चालक आपल्याच नादात पुढे चालत असतात. वाहनचालक मात्र कर्णकर्कश हॉर्न वाजवत असतो. ‘ये बाजूला घे,’ असे म्हणत वाहन चालक निघून जातात; परंतु धोक्याची ‘रपेट’ अंगावर शहारे आणणारीच असते.
वाहतूक दुप्पट... चौपाटी ‘चौपट’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 11:21 PM