विक्रेते फूटपाथवर
कऱ्हाड : शहरातील सौंदर्यात भर पडावी म्हणून पालिकेने शहरातील रस्त्यांसह त्याच्या बाजूने आकर्षक पादचारी मार्गाची उभारणी केली. त्यामुळे शहरातील नागरिक तसेच प्रवाशांकडून रस्त्यावरून चालण्याऐवजी पादचारी मार्गाचा चांगला वापर केला जाऊ लागला; मात्र आता बांधण्यात आलेल्या या पादचारी मार्गाचा प्रवासी कमी आणि विक्रेतेच जास्त फायदा घेत असल्याचे दिसून येत आहे.
साइडपट्ट्या खचल्याने वाहतुकीस धोका
नागठाणे : नागठाणेपासून तारळे रस्त्यावर रस्त्याची साइडपट्टी खचली आहे. हा रस्ता अरुंद असल्याने समोरून आल्यानंतर कोणी वाहन खाली घ्यायचे, यावरून त्यांच्यात वादावादीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे साइडपट्टी टाकण्याची मागणी होत आहे. साइडपट्ट्या खचल्या असल्याने दोन मोठी वाहने समोरासमोर आली की कोंडी होते.
अपघातास निमंत्रण
म्हसवड : मोही (ता. माण) येथील शिंगणापूर-म्हसवड मार्गावरील स्मशानभूमी शेजारी असणाऱ्या नागमोडी वळणाला झुडपांनी वेढा दिला आहे. त्यामुळे बऱ्याचदा समोरून येणारे वाहन चालकांच्या नजरेस पडत नाही. परिणामी या धोकादायक वळणावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
खड्ड्यांचा जाच थांबेना
सातारा : सातारा-कोरेगाव मार्गावरील अजंठा चौकात असणारा भला मोठा खड्डा वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. रात्रीच्या वेळी हा खड्डा दिसत नसल्याने वाहनधारकांची फसगत होत असून, अपघात होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या ‘जैथे थे’ आहे. हा खड्डा बुजविण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
रिफ्लेक्टरची मागणी
सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाही. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होतो. रिफ्लेक्टर नसल्यामुळे दिवसेंदिवस महामार्गावर लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. त्यामुळे महामार्गावर तत्काळ रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे.
पोलिसांची कमतरता
सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गावर अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी जागोजागी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिक तसेच वाहनचालकांमधून होत आहे.