मलकापूर : ढेबेवाडी फाटा येथे वाहनचालक अस्ताव्यस्तपणे रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असून, वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. ढेबेवाडी फाटा हे परिसरातील मध्यवर्ती केंद्र आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. तसेच वाहनेही याच ठिकाणी थांबतात. त्यामुळे कोंडीत भर पडते. पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
तांबवे फाट्यापासून रस्त्याची अवस्था दयनीय
तांबवे : तांबवे फाटा ते तांबवेपर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, रस्ता धोकादायक बनला आहे. तांबवे येथे नवीन पूल सुरू करण्यात आला आहे. मात्र, या मार्गावर काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. रस्त्यातील खड्ड्यांवर संबंधित विभागाने तात्पुरती मलमपट्टी केली आहे. सध्या खडी उखडून पूर्वीपेक्षा मोठे खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
येरफळे येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण
कºहाड : येरफळे, ता. पाटण येथील स्मशानभूमीत ‘माझे झाड, माझी जबाबदारी’ या उपक्रमातून आधार जनसेवा सामाजिक संस्थेच्या वतीने अनिल मोहिते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेचे सदस्य लक्ष्मण पाटील यांनी विविध प्रकारची झाडे लावली. गतवर्षी वड, पिंपळ, बेल, गुलमोहर, करंज, जांभूळ, कांचन अशी झाडे लावून व संरक्षक जाळ्या बसवून ती जगविण्यात आली. वृक्षारोपणासाठी लक्ष्मण पाटील, सोमनाथ नागरे, शेखर धामणकर, राहुल कदम, सोमनाथ जंगम, रती नागरे, बाळकृष्ण पाटील, सचिन पाटील, प्रथमेश पुजारी, श्रेयस पाटील, प्रल्हाद पाटील, आराध्या पाटील यांनी परिश्रम घेतले.
कॅनॉल ते कॉलेजपर्यंत पादचारी मार्ग दुरवस्थेत
ओगलेवाडी : कृष्णा कॅनॉल ते कॉलेज रस्त्याकडेला असलेल्या पादचारी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी कठडे ढासळले आहेत. तसेच त्याखालील नाल्यातील सांडपाणीही रस्त्यावरून वाहत आहे. सांडपाण्याची दुर्गंधी परिसरात पसरत आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच कृष्णा कॅनॉलपासून बनवडीपर्यंतचा रस्ताही दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.