महाबळेश्वर : महाबळेश्वर - तापोळा मुख्य रस्त्यावर शिवसागर पॉईंटनजीक दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. गणेश उतेकर व ग्रामस्थांनी लोकसहभागातून ही दरड हटवून मुख्य रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.
महाबळेश्वर - तापोळा मुख्य रस्त्यावर महाबळेश्वर शहरापासून अठरा किलोमीटर अंतरावर वेळापूरच्या हद्दीमध्ये शिवसागर पॉईंटनजीक मुख्य रस्त्यावर सोमवारी सकाळी सातच्या सुमारास दरड कोसळली. मोठमोठे दगड, माती मुख्य रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. दरड कोसळल्याची माहिती गणेश उतेकर यांनी बांधकाम विभागाला कळवली. बांधकाम विभागाला याठिकाणी पोहोचण्यासाठी काही वेळ लागणार होता. मात्र, दरड कोसळल्याने मुख्य रस्ताच बंद झाल्याने अनेकांना अडचण होत होती. अखेर गणेश उतेकर यांनी राजू उतेकर, पांडुरंग कदम, दीपक जाधव आदींच्या सहकार्याने रस्त्यावर आलेली दगड व माती हटवून तात्पुरत्या स्वरूपात रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.