लोकमत न्यूज नेटवर्क
मायणी : येथील आठवडा बाजार भरतो त्याठिकाणी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नसल्याने व्यापारी व ग्राहकांना आपली वाहने राज्य मार्गावर व बसस्थानकावर पार्किंग करावी लागत असल्याने आठवडा बाजाराच्या दिवशी वाहतुकीची कोंडी निर्माण होते. यावेळी बाजारपेठेत वाहनांचा मोठा गराडा पाहायला मिळतो.
मल्हारपेठ - पंढरपूर राज्य मार्गावर सुमारे दोन किलोमीटर मायणी बाजारपेठ व रहिवासी वसाहत आहे. याच मार्गाशेजारी स्थानिक बाजारपेठ, विविध बँका, पतसंस्था, शासकीय कार्यालये आहेत, त्यामुळे वाहनांची मोठी वर्दळ असते. आठवडा बाजाराच्या दिवशी तर परिसरातील अनेक गावांमधून ग्राहक व व्यापारी येत असतात. या व्यापाऱ्यांना व ग्राहकांना वाहने लावण्यासाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे हे व्यापारी व ग्राहक आपली वाहने राज्य मार्गावर मिळेल त्याठिकाणी उभी करतात.
तसेच बाजार पटांगणाजवळ मायणी मुख्य बसस्थानक आहे. याठिकाणी आठवडा बाजारावेळी मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहने लावली जातात, त्यामुळे हे ठिकाण पार्किंग स्थळ आहे का? असाच भास होत असतो. आठवडा बाजाराच्या दिवशी बसस्थानकावर पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने रविवारी एकही एस. टी. बस स्थानकावर येत नाही. त्यामुळे प्रवाशांना येथील चांदणी चौकातूनच प्रवास करावा लागत असल्याने वेळेबरोबरच आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.
अनेकवेळा स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत बाजाराच्या दिवशी स्वतंत्र पार्किंग जिल्हा परिषद शाळा याठिकाणी करण्याचे नियोजन केले होते तसेच काही दिवस त्याठिकाणी पार्किंगही झाले. मात्र, या उपक्रमात सातत्य न राहिल्याने मायणी बाजारपेठेत रविवारसह इतर दिवशीही मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहने मल्हारपेठ - पंढरपूर राज्य मार्गावर लावली जातात. त्यामुळे इतर दिवशीही मोठ्या प्रमाणात राज्य मार्गावर वाहतुकीची कोंडी होत असते, त्यामुळे बाजाराच्या दिवशी व अन्य दिवशीही स्वतंत्र पार्किंग व्यवस्था असणे गरजेचे आहे.
चौकट
रुंदीकरण झाले तरी पार्किंगचा प्रश्न
सध्या मल्हारपेठ - पंढरपूर राज्य मार्गाचे रुंदीकरण मायणी बाजारपेठेत सुरू आहे. मात्र, हे रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले तरीही पार्किंगची समस्या कायम राहणार आहे, त्यामुळे स्वतंत्र पार्किंग व्यवस्था फक्त बाजाराच्या दिवशी न करता इतर दिवशीही करणे गरजेचे आहे.
चौकट :
पार्किंगकडे वाहनचालकांचा कानाडोळा
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ग्रामपंचायतीमार्फत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या पार्किंगकडे वाहनचालक कानाडोळा करत आहेत, त्यामुळे सतत मुख्य राज्यमार्ग व बसस्थानकावर वाहतुकीची कोंडी होत आहे.
चौकट :
दंडात्मक कारवाई गरजेची
एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून अनेकवेळा बसस्थानक परिसरामध्ये लावलेल्या वाहनांची हवा सोडली जाते. हवा सोडताना अनेकदा शाब्दीक वादावादीही झाली आहे. त्यामुळे याठिकाणी लावलेल्या वाहनांवर प्रत्येक रविवारी दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे.
फोटो आहे