मलकापूर : आगाशिवनगरात रस्त्यावरील बेशिस्त पार्किंगमुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी होत आहे. याविषयी मलकापुरातील नागरिकांनी पोलिसांसह पालिकेकडे अनेकदा लेखी तक्रारी केल्या. या सर्व तक्रारींचा विचार करून पालिकेने अतिक्रमण हटविण्याचा विषय गांभीर्याने घेतला होता. कोल्हापूर नाका ते नांदलापूर हद्दीपर्यंत दोन्ही उपमार्गांवर कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यालगत अनेक विनापरवाना हातगाडे, वाहनांतून रस्त्यावरच व्यवसाय सुरु आहे. काही ठिकाणी फूटपाथवर दुकाने तर रस्त्यावर पार्किंग होत असल्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी व अपघात झाले आहेत.
शिक्षणासाठी पायपीट
मलकापूर : कऱ्हाडला विद्यानगरी म्हणून ओळखले जाते. येथे राज्यातील पहिले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केले. त्याचबरोबर विविध प्रकारची शासकीय महाविद्यालये, खासगी महाविद्यालये या विद्यानगरीत आहेत. विविध संस्थांच्या दालनात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यासाठी ते कऱ्हाडमधून विद्यानगरला दररोज ये-जा करतात. मात्र, एस. टी.अभावी शेकडो विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
दुभाजकात गवत वाढले
मलकापूर : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम झाले. यावेळी अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी दुभाजकाची निर्मिती करण्यात आली. या रस्त्याचे काम केलेल्या कंत्राटदाराने देखभाल, दुरूस्ती करण्याची मुदत काही दिवस होती. ही मुदत संपल्यानंतर रस्त्याच्या देखभालीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. चचेगाव परिसरात हळूहळू दुभाजकातील झाडे वाळली तर गवत वाढत गेले. महिला उद्योग ते चचेगाव परिसरात ब्लिंकरची मोडतोड झाल्यामुळे दुभाजकाची दुरवस्था झाली आहे.