मलकापूर : आगाशिवनगरात रस्त्यावरील पार्किंगमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांनी याबाबत पोलिसांसह पालिकेकडे अनेक लेखी तक्रारी केल्या आहेत. या सर्व तक्रारींचा विचार करून पालिकेने अतिक्रमण हटविण्याचा विषय गांभीर्याने घेतला होता. कोल्हापूर नाका ते नांदलापूर हद्दीपर्यंत दोन्ही उपमार्गावर व कऱ्हाड ते ढेबेवाडी रस्त्यालगत अनेक विनापरवाना हातगाडे, वाहनातून रस्त्यांवरच व्यवसाय करत आहेत. काही ठिकाणी फुटपाथवर दुकाने तर रस्त्यावर पार्किंग होत असल्यामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडी व अपघात घडले आहेत.
बाळासाहेब देसाई कॉलेजला पुस्तके भेट
रामापूर : पाटण येथील कोयना शिक्षण संस्थेच्या बाळासाहेब देसाई कॉलेजच्या स्पर्धा परीक्षा केंद्रास हिंदी विभागाच्या माजी विद्यार्थिनी दीपाली दत्तात्रय थोरात यांनी दिवंगत सुरेश दादू थोरात यांच्या स्मरणार्थ सुमारे पाच हजार किमतीची पुस्तके भेट दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. पवार यांनी त्यांचे आभार मानले. मातृत्व आणि दातृत्व हे थोरात कुटुंबीयांकडे आहे. त्यांच्या पुस्तक भेटीच्या रूपाने याचा प्रत्यय आला आहे, असे प्राचार्य डॉ. पवार म्हणाले, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सी. यु. माने, नॅक समन्वयक प्रा. डॉ. प्रशांत फडणीस , प्रा. डी. डी. थोरात व इतर प्राध्यापक उपस्थित होते.
कऱ्हाड आगारात रस्ता सुरक्षा कार्यक्रम
कऱ्हाड : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कऱ्हाड आगारात सुरक्षितता मोहीम, रस्ता सुरक्षा, जीवनरक्षा या कार्यक्रमांचे उद्घाटन टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे भूगोल विभागप्रमुख प्रा. राजेश धुळूगडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक आगारप्रमुख बिस्मिला सय्यद यांनी केले. यावेळी पर्यवेक्षक प्रा. धनाजीराव देसाई, किशोर जाधव, मुजावर, सुतार, वैभव साळुंखे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन महाडिक यांनी केले तर सुप्रिया पाटील यांनी आभार मानले.
विरवडेतील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार
कऱ्हाड : कऱ्हाड उत्तर मतदारसंघातील विरवडे ग्रामपंचायतीची निवडणूक सहकार व पणनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली. त्याबद्दल नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. दीपक जाधव, प्रफुल्ल वीर, सागर हाके, शैलेश कोल्हटकर, रत्नमाला धोकटे, जयश्री शिंदे, सुमन धोकटे, बेबीताई कुंभार, अर्चना मदने, वैशाली गोतपागर व तमन्ना मुजावर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
‘विठामाता’मध्ये विद्यार्थिनींची हरित शपथ
कऱ्हाड : येथील विठामाता विद्यालयातील विद्यार्थिनींनी ‘माझी वसुंधरा’ अभियानाअंतर्गत हरित शपथ घेतली. ‘माझी वसुंधरा’ अभियान राज्यभर मोठ्या उत्साहात आयोजित केले जात आहे. सामाजिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शाळा व महाविद्यालयांचा त्यामध्ये सहभाग आहे. त्यानुसार कऱ्हाडच्या विठामाता विद्यालयात विद्यार्थिनींना हरित शपथ देण्यात आली. उपशिक्षिका थोरात यांनी अभियानाची विद्यार्थिनींना माहिती दिली. उपमुख्याध्यापक कदम यांनी हरित शपथेचे वाचन केले.
सैदापूर ते ओगलेवाडी रस्त्याची दुरवस्था
कऱ्हाड : कऱ्हाड ते विटा मार्गावरील सैदापूरमधील कृष्णा कॅनॉल ते ओगलेवाडी यादरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले असून अपघातांचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर या मार्गालगत मोकाट श्वानांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. तीन ते चार ठिकाणी स्थानिकांकडून कचराही टाकला जातो. त्यामुळेच वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी कृष्णा पुलावरील रस्त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र, तेथून पुढे रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.