सातारा : संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जिल्ह्यातून १८ ते २३ जून दरम्यान जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची वाहने वगळता इतर वाहनांसाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यामध्ये १७ ते २१ जूनदरम्यान फलटण-लोणंद मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.याबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. दि. १७ च्या सकाळी ६ पासून २१ जूनच्या मध्यरात्रीपर्यंत फलटणमधून नीराकडे जाणारी वाहने बारामती किंवा वाठार स्टेशन येथून पुण्याकडे शिरगाव घाटाने जातील. दि. १७ पासून २० जूनपर्यंत आदर्की फाटा येथून लोणंदकडे जाणारी वाहतूक पालखी सोहळ्यातील वाहनाखेरीज इतरांना बंद करण्यात येणार आहे.तसेच १७ पासून २२ जूनच्या दुपारी एकपर्यंत लोणंदमधून फलटणकडे जाणारी वाहतूक आदर्कीमार्गे वळविण्यात आलेली आहे. दि. २१ ते २३ जूनच्या सायंकाळी ४ पर्यंत फलटण ते नातेपुते जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. तर २१ ते २३ जूनपर्यंत नातेपुतेकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक माळशिरस, अकलूज, बारामती पूलमार्गे पुण्याकडे वळविण्यात आली आहे. २१ ते २३ जूनच्या सायंकाळी ४ पर्यंत नातेपुतेकडून फलटणमार्गे साताऱ्याकडे येणारी वाहने शिंगणापूर तिकाटणेमार्गे दहिवडी-सातारा अशी येतील. नातेपुतेकडून पुण्याकडे जाणारी वाहने नातेपुते-दहिगाव-जांब-बारामतीमार्गे जातील.
दि. २१ ते २३ जूनच्या दुपारी २ पर्यंत नातेपुते-वाई- वाठारकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे-शिंगणापूर-जावली-कोळकी-झिरपवाडी- विंचुर्णी-ढवळपाटी-वाठारफाटामार्गे वळविण्यात आली आहे. तर २२ जून रोजी पालखी सोहळा हा फलटण येथून बरड मुक्कामी जाणार आहे. सकाळी ६ वाजता सोहळा मार्गस्थ होईल. यावेळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पालखीतील वाहने फलटण-पंढरपूर रस्त्याने बरडकडे जाण्याएेवजी फलटण-दहिवडी चाैक, कोळकी, शिंगणापूर तिकाटणे, वडले, पिंप्रद, बरड अशी जातील.