पेट्री/सातारा : सातारा शहराच्या पश्चिमेस असलेल्या सातारा-बामणोली मार्गावरील वाहतूक धोकादायक बनू लागली आहे. कास पठाराच्या तीव्र उतारावरील साईडपट्ट्या मोठ्या प्रमाणात खचल्या असून, अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी साईडपट्ट्यांची दुरुस्ती करून रिफ्लेक्टर व सूचना फलक लावावेत, अशी मागणी ग्रामस्थ, वाहनचालकांमधून होत आहे.सातारा शहराच्या पश्चिमेस यवतेश्वर, कास, बामणोली परिसरात पर्यटकांची वर्षभर रेलचेल सुरू असते. तसेच या मार्गावर कास तलाव, भांबवली, बामणोली, तापोळा येथील निसर्गसौंदर्य नेहमीच पर्यटकांना खुणावत असतो. सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने हा मार्ग निर्मनुष्य होऊन वाहनांची वर्दळही थांबली आहे.
तलावाकडे जाताना कास पठाराच्या उतारावरील साईडपट्टी गतवर्षी पावसामुळे वाहून गेली आहे. या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खोलगट चर असून, पावसाळ्यात वाहनचालकांना या रस्त्याचा अंदाज येत नाही. या मार्गावरील नादुरुस्त साईडपट्ट्यांमुळे एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच रात्रीच्या वेळी व दिवसाही रस्त्याचा अंदाज न आल्यास एखादी विपरित घटना घडू शकते. तरी येथील नादुरुस्तीत साईडपट्ट्यांची कामे संबंधित विभागाने त्वरित पूर्ण करावीत, अशी मागणी ग्रामस्थ, वाहनचालकांतून होत आहे.
कास-बामणोली मार्गावर दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. लॉकडाऊन काळात रहदारी थांबली असल्याने पावसापूर्वी नादरुस्त साईडपट्ट्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात एखादी विपरित घटना घडू शकते.- निकेश पवार, वाहनचालक सातारा