दशरथ ननावरे ल्ल खंडाळापुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात नवीन बोगदा प्रस्तावित करण्यात आला आहे. वास्तविक, या नव्या बोगद्यामुळे वाहतूक व्यवस्था आणखी सुरळीत करण्याचा प्रयत्न असला तरी यामध्ये तीन गावांतील स्थानिक शेतकऱ्यांना भूमिहीन किंवा अल्पभूधारक होण्याची भीती असल्याने त्यांनी या बोगद्याला कडाडून विरोध दर्शविला आहे.पुण्याहून साताऱ्याला जाण्यासाठी नवीन बोगद्याची आखणी करण्यात आली आहे. त्याच्या आराखड्याचे सादरीकरण मुंबई येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर करण्यात आले. या बोगद्याच्या कामाचा डीपीआर तयार करण्याचे आदेश दिल्याने हा बोगदा नक्की कोणत्या ठिकाणावरून होणार याबाबत संभ्रमता आहे. वास्तविक यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत. सध्याच्या बोगद्याच्या पश्चिम बाजूने बोगदा होण्याची शक्यता आहे. बोगद्यापासून निघणारा रस्ता खंडाळा येथील जुन्या टोल नाक्याजवळ व सध्याच्या महामार्गाला जोडला जाणार असल्याचे समोर येत आहे. या बोगद्यासाठी वाण्याचीवाडी, खंडाळा, वेळे या तीन गावांची सर्वाधिक जमीन संपादित केली जाणार असल्याने येथील शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता आहे. यापूर्वी धोम-बलकवडी प्रकल्पाच्या कालव्यासाठी जमिनी गेल्या आहेत. पहिल्या बोगद्याचासुद्धा फटका या गावांना बसला होता. आता या नव्या बोगद्यातही शेतकरी भरडला जाणार असल्याने शासनाने शेतकऱ्यांच्या कमीत कमी जमिनी जातील याची काळजी घेणे गरजेचे आहे. एस कॉर्नरवर उपाय होणार का ?पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडे जाताना खंबाटकी घाटातील बोगदा ओलांडल्यानंतर ‘एस’ कॉर्नर आहे. या ठिकाणी सतत अपघात होत असतात. येथील नव्या बोगद्याच्या प्रस्तावित कामामध्ये ‘एस’ कॉर्नरच्या अशास्त्रीय वळणावर उपाययोजना होणार का याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
वाहतूक व्यवस्थेचे ठीक; पण शेतकऱ्यांचे काय..?
By admin | Published: April 18, 2017 11:10 PM