कोपर्डे हवेली : येथील रेल्वे गेटवर अपघात होऊन मळी वाहतूक करणारा टँकर रूळावरच अडकल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. तीन गाड्या अर्धा ते एक तास उशिरा धावल्या. जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने टँकर बाजुला घेतल्यानंतर रात्रीउशिरा रेल्वे तसेच कऱ्हाड-मसूर मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मळी वाहतूक करणारा एक टँकर मंगळवारी सायंकाळी मसूरहून कऱ्हाडच्या दिशेने निघाला होता. संबंधित टँकर कोपर्डे हवेली येथील रेल्वे गेटवर आला असताना समोरून आलेल्या कऱ्हाड-कोरेगाव एस. टी. ला टँकरची धडक बसणार होती. हा अपघात टाळण्यासाठी चालकाने टँकर एका बाजूला घेतला. त्यामुळे टँकरची रेल्वे गेटच्या खांबाला धडक बसली. या घटनेनंतर एस. टी. तेथुन निघून गेली. मात्र, टँकर रूळावरच अडकून बसला. घटना निदर्शनास येताच रेल्वे कर्मचारी घटनास्थळी धावले. त्यांनी घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. त्यामुळे कोल्हापुरला जाणाऱ्या व कोल्हापुरहून येणाऱ्या रेल्वे गाड्या नजीकच्या स्थानकावर थांबविण्यात आल्या. रूळावर अडकलेला टँकर काढण्यासाठी जेसीबी व ट्रॅक्टर बोलविण्यात आला. मात्र, टँकरमध्ये मळी जास्त असल्याने जेसीबी व ट्रॅक्टरनेही टँकर हटविता आला नाही. अखेर टँकरमधील मळी सोडण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा टँकर तेथुन हटविण्यात आला. या प्रकारामुळे मुंबई ते हुबळी जाणारी लोकमान्य टिळक एक्सप्रेस व कोल्हापूर ते गोंदीया जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस या दोन गाड्या अर्धा तास तर मुंबई ते कोल्हापूर जाणारी कोयना एक्सप्रेस एक तास उशिरा धावली. (वार्ताहर)मळी सांडलेला रस्ता धुतलाटँकरमधील मळी रस्त्यावर सोडून देण्यात आल्याने कऱ्हाड-मसूर रस्त्यावरील वाहतुकही ठप्प झाली होती. अखेर पाण्याचा टँकर त्याठिकाणी बोलावून घेऊन संपुर्ण रस्ता धुण्यात आला. त्यानंतर मसुर मार्गावरील वाहतूक पुर्ववत झाली. रात्री उशिरा रेल्वे गेटच्या ‘बुम लॉक’चे काम सुरू करण्यात आले.
रुळावर टॅँकर अडकल्याने रेल्वे ‘लेट’
By admin | Published: July 01, 2015 12:29 AM