कुत्र्यांची नसबंदी
कुडाळ : पाचगणी येथील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त जेनी स्मित ॲनिमल वेल्फेअर ट्रस्टने केला आहे. येथील सुमारे १४० कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे, ही ट्रस्ट गेली दहा वर्षांपासून भटक्या कुत्र्यांपासून नागरिकांचे संरक्षण करत आहे. पाचगणी महाबळेश्वर परिसरात भटक्या कुत्र्यांची प्रमाण वाढले होते..
नागझरीत वणवा
कोरेगाव : नागझरी (ता. कोरेगाव) गावच्या हद्दीवर भीषण वणवा लागला. मात्र कोरेगाव वनविभागाच्या सतर्कतेमुळे आटोक्यात आला. अन्यथा साडेनऊ हेक्टरवरील जंगलातील पशुपक्ष्यांचा निवारा, नैसर्गिक साधन संपत्ती जळून खाक झाली असती.
कोबी झाला स्वस्त
सातारा : कमी कालावधीत जादा पैसा मिळतो, या आशेवर अलीकडे शेतकरी भाजीपाला, पालेभाज्यांचे उत्पादन घेण्याकडे वळले आहेत. सध्या बाजारपेठेत भाज्यांचे दर गडगडले आहेत. त्यात कोबीचा दर तर एक रुपया किलोवर आला आहे. त्यामुळे कोबी उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडल्यासारखी स्थिती झाली आहे.
एसटी सेवा पूर्ववत
सातारा : कोरोना कमी झाल्याने कॉलेज, महाविद्यालये पूर्ववत सुरू होत आहेत. विद्यार्थी तसेच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
सीसीटीव्हीची गरज
सातारा : साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानकातील प्रतीक्षालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. मात्र एकाच वेळी दोन-तीन लाइनमध्ये गाड्या लावलेल्या असतात. त्यामुळे अनेक भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत नाहीत. त्यामुळे कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मास्कला मागणी
सातारा : जिल्ह्यात आता पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू झाले आहेत. शाळेत मुलांची गर्दी वाढत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे मुलांना दप्तरासोबत पाण्याची बॉटल तसेच सॅनिटायझर दिले जात आहे. त्याचप्रमाणे मास्क घेतले जात आहेत. त्यामुळे मागणी वाढत आहे.
पाण्याची टंचाई
खटाव : सतत भेडसावणार्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाने १९७२च्या दुष्काळात मांजरवाडी शिवारात गव्हल आणि पवारवस्तीनजीक अशा दोन हजार तलावांची निर्मिती केली. मात्र या तलावांना सुरुवातीपासून गळतीचे ग्रहण अद्याप सुटलेले नाही. त्यामुळे तलाव महिन्याभरात कोरडे पडत आहे.
ओढ्यावर अतिक्रमणे
सातारा : पालिकेच्या हद्दवाढीत विलासपूर परिसराचा समावेश करण्यात आला आहे. भागातील प्लॉटधारकांनी अनधिकृत बांधकामे केल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. या परिसरातील रहदारी वाढल्याने आता पालिकेने अनधिकृत बांधकामे पाडून मुख्य रस्ते मोठे करण्याची गरज आहे.