सातारा : जिल्हा परिषदेतील विविध पाच विभागातील ३२ कर्मचारी, अधिकाऱ्यांची सोमवारी बदली करण्यात आली. प्रशासकीय, विनंती तसेच आपसी अशा या बदल्या केल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या ठराविकच बदल्या होणार आहेत. सोमवारी अर्थ विभाग, पशुसंवर्धन, कृषी विभाग, बांधकाम आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना यामधील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. अर्थ विभागामध्ये सहायक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ सहायक (लेखा) व कनिष्ठ सहायक लेखाच्या बदल्या केल्या. अशाप्रकारे अर्थ विभागातील ७ जणांची बदली केली आहे. पशुसंवर्धन विभागात सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक आदींची बदली झाली. या विभागात एकूण ६ जणांची बदली झाली.
कृषी विभागात कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी अशा एकूण तीन बदल्या झाल्या. बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अशा मिळून ६ जणांची बदली झाली. एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागात अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या एकूण १० बदली प्रक्रिया केल्या.
सोमवारी झालेल्या या बदली प्रक्रियेत प्रशासकीयमधील १०, विनंतीच्या १६ आणि आपसी बदल्या ६ केल्या आहेत, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी दिली.
.........................................................................