सातारा : चांगल्या दजार्ची साधनसामग्री आणि अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत पोलीस दलही गतिमान सेवा देऊ शकत नाही. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधील ३ टक्के रक्कमेतून पोलीस दलाला यावर्षी १२ कोटी रुपये निधी दिला. यातून ८ ड्रोन कॅमेऱ्यासह पोलिसांच्या ताफ्यात १५ दुचाकी आणि ६ वातातुकुलीत मिनी बससह संगणक आणि सीडीआर अॅनालीसीस प्रणाली पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थतीत हस्तांतरीत करण्यात आली.यावेळी बोलताना पालकमंत्री देसाई म्हणाले, शासन पोलीस दल अद्ययावत करण्यासाठी साधन सामुग्री उपलब्ध करुन देत आहे. पोलीस दलाची प्रतिमा बदलत असून ११२ या क्रमांकाला प्रतिसाद कालावधी ७ ते ८ मिनीटांवर आला आहे. पोलीस दल अत्यंत कार्यक्षम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना समाजात कोणतीही तेढ निर्माण न होऊ देता जिल्हा पोलीस दलाने कौशल्याने स्थिती हाताळली. यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांना जिल्हा अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती असून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत अतिशय चांगली आहे, असे कौतुक करुन त्यांनी ग्राम सुरक्षा दल उपक्रमालाही शुभेच्छा दिल्या.
पोलीस दल आधुनिकीकरणासाठी या सोयीजिल्हा नियोजन समिती निधीमधून ९५ लाख २० हजार किंमतीचे ८ ड्रोन कॅमेरे, जिल्हयातील एकुण ३२ पोलीस ठाणे, ७ उपविभागीय कार्यालये आणि ११ शाखांचे अत्याधुनिकीकरणासाठी ५० संगणक संच, ५० प्रिंटर आणि ५० युपीएस ३३ लाख २७ हजार रूपये किंमतीचे खरेदी करण्यात आले आहेत. ६ लाख ५६ हजार किंमतीची सीडीआर अॅनिलीसीस प्रणाली, १ कोटी ३६ लाख किंमतीचे ४० जनरेटर सेट, ११ लाख ६८ हजार किंमतीची १५ दुचाकी वाहने, १ कोटी २२ लाख ९७ हजार किमतीचे ६ वातानुकुलीत मिनी बस खरेदी करण्यात आले आहेत.