सातारा : सातारा पालिकेतील चार अभियंत्याची बदली झाली असून, दोन अभियंते सातारा पालिकेत बदलून आले आहेत. नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडून मंगळवारी बदलीचा आदेश सातारा पालिकेला ई-मेल द्वारे प्राप्त झाला. संबधित अभियंत्यांना नव्या आस्थापनेत चोवीस तासात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.नगरपरिषद संचालनालयाच्या सहाय्यक संचालक कल्पिता पिंपळे यांनी या बदल्यांची घोषणा करून तसा ई-मेल सातारा नगरपालिकेला पाठवला आहे. त्यानुसार सातारा पालिकेच्याचा अभियंत्याची इतरत्र बदली झाली असून दोन अभियंत्यांची सेवा सातारा पालिकेकडे वर्ग करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.बांधकाम विभागाचे अभियंता विभावरी देसाई यांची बदली फलटण तर मुरलीधर धायगुडे यांची बदली कऱ्हाडयेथे झाली आहे. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता दिग्विजय गाढवे यांची पाचगणी पालिका तर विद्युत विभागाचे अभियंता महेश सावळकर यांची वाई नगरपालिकेत बदली झाली आहे. लोणावळा नगरपरिषदेतून दिलीप चिद्रे यांची तर कऱ्हाड पालिकेतून रत्नाकर बाढई यांची सातारा पालिकेत सेवा वर्ग झाली आहे.
चिद्रे यांनी यापूर्वी सातारा पालिकेत बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता म्हणून काम केले आहे. त्यांची पुन्हा साताऱ्यात बदली झाल्याने बांधकाम विभागाचे मुख्य भाऊसाहेब पाटील यांची बदली निश्चित मानली जात आहे.