करंजे : करंजे येथे ट्रान्सफॉर्मरवर व शेजारी असलेल्या विद्युत वाहक खांबांवर वेलींचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गावातील मध्यवर्ती ठिकाणी महावितरणाचा ट्रान्सफॉर्मर धोकादायक बनला आहे. या ट्रान्सफॉर्मरशेजारी नागरिकांची वस्ती, खेळाचे पटांगण, तलाठी कार्यालय, रेशन धान्य दुकान, सांस्कृतिक भवन, सोसायटी व लहान मुलांची शाळा आहे. त्यामुळे येथे सतत नागरिक व लहान मुलांची वर्दळ असते. या ट्रान्सफॉर्मर भोवतीचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत असून, नेहमी उघडे असल्याने शेजारीच असलेल्या पटांगणात खेळत असलेली लहान मुले खेळताना चेंडू आणण्यासाठी आतमध्ये ये-जा करीत असतात. त्यामुळे न जाणो एखाद्या वेळी अघटित घटना घडून जीवितहानी होऊ शकते.
या ठिकाणी काही नागरिक भाजीपाला विक्री करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे या ट्रान्सफॉर्मरशेजारी नागरिकांची गर्दी होत आहे. तलाठी कार्यालय व सांस्कृतिक भवन व सोसायटीमध्ये आलेले नागरिक येथे वाहन पार्क करत असतात. या वाहनांवर वाऱ्याने वेलींचा स्पर्श होत असतो. त्यामुळे अनवधानाने विद्युत प्रवाह वाहनांना होऊन किंवा एखाद्या व्यक्तीला लागून जीवितहानी होणार हे नक्कीच. रेशन धान्य दुकानात आलेली मंडळीही रांगेत उभी असताना उन्हाचा चटका बसू नये म्हणून येथे सावलीखाली बसतात. बऱ्याच वेळा या ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन ट्रान्सफॉर्मरवर व विद्युत वाहक खांबांवर आग लागलेली नागरिकांनी पाहिलेली आहे व काही वेळेस ट्रान्सफॉर्मरवर जास्त लोड आला, तर त्यातून ठिणग्या खाली पडतात. त्या वेळेस जर खाली कोणी असेल, तर न जाणो कोणाचा तरी जीव जाऊ शकतो. लॉकडाऊनमुळे येथील लहान मुलांची शाळा बंद आहे; परंतु शाळा सुरू असताना या ठिकाणी लहान मुले शौचासाठी येथे येत असतात व सतत दार उघडे असल्याने तेथे ये-जा करीत असतात. भविष्यात मोठा अनर्थ घडल्याशिवाय राहणार नाही, याची दखल घेऊन वेळीच महावितरणने येथील साफसफाई करून दरवाजांची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांमधून होत आहे.
कोट : कित्येक ठिकाणी अशा उघड्या ट्रान्सफॉर्मरमुळे जीवितहानी झाली आहे. तरीही महावितरणकडून बऱ्याच वेळी जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते; परंतु करंजे येथील हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.
-बाळासाहेब ढेकणे, नगरसेवक