पेट्री : फुलांची पंढरी म्हणून ओळखले जात असलेले कास पठारावर सलग सुट्यांमुळे पर्यटकांच्या गर्दीने फुलले आहे. कास पठारावरील मुख्य आकर्षण असलेले विविध आकारातील, रंगातील फुले फुलली नसली तरी रविवारी कास पर्यटकांनी बहरले होते. रविवारी तब्बल दीड हजार पर्यटकांनी भेट दिली असून पठारावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. यावेळी पोलिसांनी हुल्लडबाजी करणाऱ्या अकरा वाहनचालकांवर कारवाई केली. सातारा शहरापासून २२ किलोमीटर अंतरावरील कास पठार जैवविविधतेमुळे प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. जागतिक वारसास्थळ असणारे कास पठाराचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये म्हणजे विविधरंगी दुर्मीळ फुले पाहण्यासाठी राज्यभरातील पर्यटक आसुसले आहेत. अशी फुले अद्याप आलेले नसले तरी हौसी पर्यटक पठाराला भेट देत आहेत. सतत उन्हाची तीव्रता कायम राहिल्यास आठ ते पंधरा दिवसांत विविधरंगी फुलांचे गालिचे पाहावयास मिळण्याची शक्यता आहे. कास पठाराचे विविधरंगी फुलांनी कसे रूप पालटते याची पर्वणी अनुभवता येणार आहे. गेल्या आठवडाभरात पावसाचा जोर कमी आल्याने तसेच अधूनमधून उन्हाची चांगलीच ताप पडत असल्याकारणाने पठारावर पांढऱ्या रंगाची फुले बहरू लागली आहेत. तसेच टूथब्रश, तेरडा, पंद, नीलिमा, अबोलिमा, गेंद, चवर, सोनकी, कापरू, भारंगी, दीपकांडी अशी पिवळी-निळी रंगांची फुले पठारावर तुरळक प्रमाणात फुलली आहेत. तसेच पठारावरील दुर्मीळ फुलांचे फोटो देखील पर्यटक आपल्या कॅमेऱ्यात टिपताना दिसत आहेत. मात्र फुले न आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
कास पठार बहरले फुलांऐवजी पर्यटकांनी...!
By admin | Published: August 29, 2016 12:02 AM