सातारा : ‘दूध पोळल्यानंतर माणूस ताकसुद्धा फुंकून पितो,’ असं म्हणतात, याचाच प्रत्यय सध्या सातारा मध्यवर्ती बसस्थानकात अनुभवास मिळत आहे. एका माथेफिरूने फेब्रुवारीमध्ये शिवशाही गाडी पेटविली होती. त्यात पाच गाड्या जळून खाक झाल्या. त्यानंतर या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलीस सातत्याने बंद अवस्थेतील गाड्यांवर लक्ष ठेवून आहेत.
सातारा जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. तेव्हापासून एस.टी.ची चाके दसऱ्यापर्यंत एकाच जागी खिळली होती. त्यानंतर सुरू झाली; पण साध्याच गाड्या धावत होत्या. त्यामुळे खासगी शिवशाही गाड्या मध्यवर्ती बसस्थानकात बंद अवस्थेत होत्या. त्यांतील काहींचे दरवाजेही उघडे होते. याचा फायदा घेऊन काहीजण आत जाऊन बसत होते.
अज्ञात व्यक्तीने फेब्रुवारीमध्ये एक शिवशाही पेटविली. यामुळे तिच्या आसपास असलेल्या पाच गाड्यांनीही पेट घेतला होता. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी काहींनी शिवशाही गाडीतून बाहेर पडताना एकाला पाहिले होते. या घटनेला दोन महिने झाले आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सध्या दररोज सरासरी दोन हजारांहून अधिक रुग्ण बाधित येत आहेत. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन पुन्हा जाहीर केला आहे. त्यामुळे सातारा मध्यवर्ती बसस्थानकातून रोज खूपच कमी प्रमाणात गाड्यांच्या फेऱ्या होत आहेत. विनाकारण प्रवास करण्यालाही निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील तसेच ई-पास असलेल्यांना प्रवास करता येत असल्याने बसस्थानकात शुकशुकाट जाणवत आहे. तरीही अप्रिय घटना घडू नये यासाठी बसस्थानकातील पोलीस बंद गाड्यांवर विशेष लक्ष ठेवून असून अधूनमधून एक चक्कर मारीत आहेत.
चौकट
पाऊस पडला की आत
गेल्या दोन -तीन दिवसांपासून साताऱ्यात पाऊस पडत आहे. पाऊस पडल्यानंतर परिसरातील काही तरुण पळत येऊन एस.टी.त जाऊन बसत असतात. हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
कोट :
काही एस.टी. बसचे दरवाजे अजूनही उघडे आहेत. त्यात कोण जाऊन बसले तर दुर्घटना घडू शकते. ते घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या सूचनेनुसार दिवसातून दोन ते तीन फेऱ्या मारून कोण बसलेले असल्यास त्यांनाहाकलून देत असतो.
- दत्ता पवार,
पोलीस हवालदार, सातारा
फोटो जगदीश कोष्टी यांनी मेल केला आहे.
सातारा मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही गाड्यांत कोणी बसलेले नाही ना याची पोलीस हवालदार दत्ता पवार हे तपासणी करीत असतात. (छाया : जावेद खान)