कऱ्हाड : पुणे-बंगळुरू महामार्गावर सहापदरीकरण करताना कऱ्हाड कोल्हापूर नाका येथील दोन उड्डाणपूल पाडण्यात येणार आहेत. कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्यासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून म्हणजेच दि. ५ फेब्रुवारी रात्री १२ वाजल्यापासून वाहतूक वळविण्यात येणार असून, पूल पाडण्याचे काम दि. २५ मार्चपर्यंत चालणार आहे.तर उड्डाणपूल तयार करण्यासाठी २० महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. कोल्हापूर नाका उड्डाणपूल पाडण्यासंदर्भात आणि वाहतुकीबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.महामार्गाच्या सहापदारीकरणात मलकापूर शहर हद्दीत २९.५ मीटर रुंद व ३.४७० मीटर किमी लांबीचा ११५ पिलरवर आधारित असा सहापदरी ग्रेडसेपरेटरसह उड्डाणपूल होणार आहे. त्याचबरोबर ७.५ मीटर रुंदीचे व ३.४७० किमी लांबीचे दोन्ही बाजूर स्लिपरोड होणार आहेत. महामार्गाच्या सहापदरीकरणास गतीने सुरुवात झाली आहे. कोल्हापूर नाक्यावरील जुना उड्डाणपूल पाडण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.उड्डाणपूल कामामुळे वाहतुकीत बदल पुढीलप्रमाणे :
- कोल्हापूरकडून सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक ढेबेवाडी फाट्यावरील ओव्हरब्रिज कऱ्हाड बाजूस ज्या ठिकाणी संपतो, तेथे पश्चिमेकडील सेवारस्त्यावर वळविण्यात येणार आहे.
- कोल्हापूरहून कऱ्हाडमध्ये येणारी वाहने ही एकेरी वाहतुकीने वारुंजी फाट्यापर्यंत येतील. तेथून पुढे -
- जड वाहतूकही वारुंजी फाटा येथून हॉटेल पंकजसमोरून सेवा रस्त्यामार्गे महात्मा गांधी पुतळ्यासमोरून कऱ्हाडमध्ये जाईल.
- हलकी वाहतूक ही वारुंजी फाटा येथून जुना कोयना ब्रिजमार्गे कऱ्हाडमध्ये जाईल.
- कऱ्हाड शहरामधून कोल्हापूर नाका येथे बाहेर पडणाऱ्या वाहनासाठी -
- कोल्हापूर बाजूकडे जाण्यासाठी सेवा रस्ता मार्गाचा वापर करून जाता येईल.
- कऱ्हाडमधून साताराकडे जाणारी वाहने भादी हार्डवेअरसमोरून उजवीकडे यू-टर्न घेऊन नंतर इंडियन ऑइल पेट्रोलपंपाजवळ सर्व्हिस रोडला मिळणार आहेत.
- सातारा ते कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक हॉटेल पंकजसमोरून पश्चिमेकडील कोल्हापूर-सातारा लेनवर वळविण्यात येईल व कोल्हापूर नाक्यावरील ब्रिज संपल्यानंतर पूर्वेकडील सेवा रस्त्यावर एकेरी मार्गाने घेण्यात येईल. कृष्णा हॉस्पिटलसमोरील ब्रिज संपल्यानंतर गंधर्व हॉटेलजवळ वाहतूक पूर्ववत महामार्गावर घेण्यात येईल.
- साताराकडून कोल्हापूरकडे (वारुंजी फाटा ते गंधर्व हॉटेल) व कोल्हापूरकडून साताराकडे (कोयना वसाहत ते वारुंजी फाटा) जाणारी वाहतूकही एकेरी वाहतूक असल्याने विरुद्ध दिशेने वाहने चालविण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच त्या मार्गावर कोणत्याही प्रकारची वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे.
- कऱ्हाड बाजूकडून ढेबेवाडीकडे जाणारी वाहतूकही कोल्हापूर नाका ते ढेबेवाडी फाट्यापर्यंत एकेरी मार्गाने ढेबेवाडी फाट्यापर्यंत जाऊन ब्रिजखालून ढेबेवाडीकडे जाईल.
- ढेबेवाडी बाजूकडून कऱ्हाड शहराकडे येणारी वाहतूकही ढेबेवाडी फाटा येथून पश्चिमेकडील सेवा रस्त्याने वारुंजी फाटा मार्गे कऱ्हाडमध्ये येईल.
- जड वाहतूक (ओडीसी वाहने) ही फक्त रात्रीच्या वेळी वाहतुकीस परवानगी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- कोल्हापूर नाका ते पंकज हॉटेल या मार्गावर असणारे भुयार बंद राहणार आहे.