सातारा : ‘शासकीय कार्यालयात सत्यनाराण किंवा इतर कोणत्याच धार्मिक पूजाअर्चा घालू नये,’ असे संविधान सूचित करते. तरीही जिल्हा कोषागर कार्यालयात सत्यनारायण पूजा घालून धर्मनिरपेक्षता या मूल्याची पायमल्ली केली. संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, अशी मागणी परिवर्तनवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांमधून होत आहे.विविध परिवर्तनवादी चळवळीतील प्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘पाच फूट उंचीच्या फ्रेममध्ये जेथे संविधानाची प्रस्तावना लावली आहे, त्याच्या समोरच ही पूजा घातली गेली. त्यामुळे संबधित अधिकाऱ्यांवर संविधानद्रोहाचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई करावी. जिल्हा कोषागर कार्यालयात घडलेला प्रकार हा संविधानाला बाधा पोहोचवणारा असल्याने विविध परिवर्तनवादी संघटनांच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष कोषागर कार्यालयात जाऊन तेथील प्रशासन प्रमुख दीपक शिंदे यांच्याशी चर्चा केली. धर्मनिरपेक्षता अंमलबजावणी अभियानाचे प्रवर्तक अरुण जावळे, विद्र्रोही सांस्कृतिक चळवळीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष पार्थ पोळके, लोकशाही आघाडीचे प्रमुख चंद्रकांत खंडाईत, कॉ. अस्लम तडसरकर, गौतम वाघमारे, विद्यार्थी संसदेचे गणेश भिसे, कॉ. विजयराव निकम यांनी शिंदे यांना संविधानाबाबत माहिती दिली. यावेळी ‘भविष्यात अशी चूक होणार नाही, याची काळजी घेऊ,’ असे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले. तसेच दिवसभराचा कार्यक्रम थांबविण्याबाबत सहमती दर्शविली. या घटनेमुळे शासकीय दालनातील सत्यनारायण पूजा रोखली. भारतीय संविधानाला धर्म नसून ते धर्मनिरपेक्ष आहे. शासनस्तरावर या तत्त्वमूल्यांचा अंमल व्हावा, असे मार्गदर्शन करते. म्हणजेच शासन हे निधर्मी आहे. त्यामुळे शासनाने स्वत:च्या जागेत, स्वत:ची स्थावर, जंगम मालमत्ता वापरून पूजाअर्चा, धार्मिक विधी करता कामा नये, हे धर्मनिरपेक्षता या तत्त्वात अभिप्रेत आहे. - अरुण जावळेप्रवर्तक, धर्मनिरपेक्षता अंमलबजावणी अभियान
कोषागरात शासकीय सत्यनारायण पूजा रोखली
By admin | Published: August 26, 2016 12:25 AM