पाटण : पाटण तालुक्यात वृक्षसंपदा मोठ्या प्रमाणात आहे; मात्र तालुक्यात अनेक ठिकाणी झाडांची तोड केली जात आहे. वृक्षतोडीमुळे अनेक डोंगर उजाड झाले आहेत. वन विभागाचेही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. वन विभागाने वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वृक्षप्रेमींमधून होत आहे.
विहीर धोकादायक
कऱ्हाड : किरपे ते येणके रस्त्यावर व येणके हद्दीत असलेली विहीर धोकादायक ठरत आहे. रस्त्याकडेला काढण्यात आलेल्या या विहिरीला संरक्षक कठडेही बांधण्यात आलेले नाहीत. याशिवाय कोणत्याही सूचनांचे फलक लावले गेले नाहीत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. येथे उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
धोकादायक वितरण (फोटो : २२इन्फो०२)
कऱ्हाड : विद्यानगर परिसरात गॅस सिलिंडरचे वितरण करताना सिलिंडर रस्त्यावर टाकले जात आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गॅस वितरण करणाऱ्या गाड्या गल्लोगल्ली फिरत असतात. त्याठिकाणी टाक्यांचे वितरण करताना कर्मचारी वाहनातूनच टाकी खाली टाकून देतात. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्यावरच मंडई
कऱ्हाड : येथील मुख्य टपाल कार्यालय रस्त्यावर बसून भाजी विक्रेत्यांकडून व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. पालिकेतर्फे संभाजी भाजी मंडईत जागा देऊनही तेथे विक्रेते बसत नाहीत. टपाल कार्यालयाकडे जाणारा रस्ता रुंद आहे. मात्र, विक्रेते बसत असल्याने याठिकाणी कोंडी होते. याबाबत योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे.