खंडाळा : ‘पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडेझुडपे महत्त्वाचे घटक आहेत. वातावरणातील नैसर्गिक ऑक्सिजन पातळी समान ठेवण्यासाठी झाडांचे योगदान मोठे आहे. गावोगावी वृक्षारोपणाची मोहीम राबविल्यास पर्यावरण संतुलनासह परिसराचा कायापालट होऊ शकतो म्हणूनच वृक्षारोपण ही काळाची गरज आहे’, असे मत सभापती राजेंद्र तांबे यांनी व्यक्त केले.
अंदोरी, ता. खंडाळा येथे ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ सभापती राजेंद्र तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या दीपाली साळुंखे, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन आडे, सरपंच प्रदीप होळकर, उपसरपंच सुचेता हाडंबर, सदस्य बाळासोा होवाळ, किसन ननावरे, कैलास भिसे, दत्तात्रय धायगुडे, नवनाथ ससाणे, काळुराम होळकर, संजय जाधव, सिद्धार्थ खुंटे, ग्रामसेवक रवींद्र धायगुडे यांसह प्रमुख उपस्थित होते.
सभापती तांबे म्हणाले, ‘कोरोनाच्या काळात माणसाला ऑक्सिजनचे महत्त्व कळून आले आहे. कृत्रिम ऑक्सिजन घेऊन जीव जगवावा लागत आहे. मात्र, हेच काम झाडे सातत्याने करीत असतात. वाढत्या लोकसंख्येमुळे जंगलात अतिक्रमण होऊ लागले आहे. त्याचा परिणाम झाडांवर होऊन त्याचे प्रमाण घटले आहे. ते पूर्ववत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लागवड होणे गरजेचे आहे. या मोहिमेसाठी अंदोरी ग्रामपंचायतीला सर्वतोपरी सहकार्य करू, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
...............................................