वाई : सिद्धनाथवाडी येथील राजा शिवछत्रपती शिवजयंती उत्सव मंडळ, सायली कट्टा यांच्यावतीने रविवारी सोनजाई डोंगरांमध्ये जवळपास १४० झाडांचे रोपण करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत कार्यात सातत्याने सहभागी असलेल्या सायली कट्टा येथील तरुणांनी आदर्शवत असे कार्य गेली अनेक वर्षे सुरू केले आहे.
रविवार १८ रोजी सिद्धनाथवाडी हद्दीतील सोनजाई डोंगराच्या गणपत दरा परिसरात खैर, कवट, करंज, आवळा, वड, पिंपळ, उंबर, बहावा, कांचन अशा सुमारे १५० झाडांच्या रोपांचे वनविभागाच्या साह्याने वृक्षारोपण केले. तसेच वृक्षारोपण करून ते वृक्ष जगवायचे, वाढवायचे असा निर्धार करून त्याचे पालकत्व आम्ही घेत आहोत, असे आश्वासन सायली कट्टा येथील तरुणांनी वनविभागाला दिले. या वेळी वाई वनविभागाचे वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे, प्रशांत डोंगरे, मंडळाचे अध्यक्ष सनी चव्हाण, प्रसाद कचरे, अभिजित वाघ, मनीष जायगुडे, बाळू नाटेकर, किरण शिंदे, नितीन चौधरी, अक्षय घाडगे, प्रशांत सुळके, रोहित राजपुरे, सुजित निकम, शेहजाद शेख, महेश शिंदे, अमोल बोडके, हृषीकेश कचरे, प्रतीक चौधरी, अभिजित सुतार आदी सदस्य उपस्थित होते.