म्हसवड : विद्यार्थ्यांमध्ये झाडांबद्दल मित्रत्वाची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. वृक्ष माझा सखा हा उपक्रम माण तालुक्यापुरता मर्यादित न राहता जिल्हाभर राबविण्यात यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
लोधवडे, ता. माण येथे ग्राम सचिवालय कार्यालयात प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांची वृक्ष संवर्धन आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी कोकणचे माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, मिटकॉनचे अध्यक्ष गणेश खामगळ, पाणी फाउंडेशनचे रवींद्र टोमणे, रिना कवर, अनुराधा देशमुख, वैभव मोरे, रमेश शिंदे, अजित पवार, डॉ. माधव पोळ, गटविकास अधिकारी शेलार, गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते, सरपंच अपर्णा नष्टे, उपसरपंच मंदाकिनी कदम उपस्थित होते.
शिक्षकांना मार्गदर्शन करताना संजीवराजे पुढे म्हणाले, माण तालुका दुष्काळी असला तरी येथे बुद्धीचा सुकाळ आहे. बुद्धीच्या जोरावर तरुणांनी विविध क्षेत्रात यश मिळविले आहे. प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा उपक्रम यशस्वी होऊन या मातीचा दुष्काळी कलंक पुसणार आहे.
अध्यक्षीय भाषणात प्रभाकर देशमुख म्हणाले, जसे आपण मुलांवर संस्कार करता त्याप्रमाणे वृक्षावरही संस्कार होणे गरजेचे आहे. गणेशोत्सव कार्यक्रमातही पर्यावरण पूरक विविध देखावे, उपक्रम सादर करून मंडळांनी सामाजिक प्रबोधन करावे, असे आवाहन केले.यावेळी गणेश खामगळ, रवींद्र खोमणे, सोनाली विभूते यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.