.........
गळतीसाठी रस्ता खुदाई
सातारा : सातारा शहरात काही ठिकाणी गळती काढण्यासाठी चांगल्या रस्त्यांची खुदाई करण्यास सुरुवात झालेली आहे. नगरपालिकेच्या जुन्या प्रवेशद्वारापासून जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खुदाई करण्यात आलेली आहे. या खुदाईमुळे रस्ता खराब होत आहे. पालिकेने या रस्त्यांची तत्काळ डागडुजी करून घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
........
सायकलिंगचा आनंद घेण्यावर भर
सातारा : शहरात दुपारनंतर रस्ते रिकामे पडतात. त्यामुळे मुले सायकल चालविण्यासाठी बाहेर पडत आहेत. मोकळ्या रस्त्यावर सायकल चालविणे सुरक्षित असल्याने पालक देखील मुलांना प्रोत्साहन देत आहेत. शहरातील अनेक कॉलनीमध्ये मुले सायकली चालवत असल्याने वाहनधारकांनी आपली वाहने सावकाश चालवावेत, अशी स्थानिक जनतेची मागणी आहे.
........
हद्दवाढीच्या भागात गैरसोय
सातारा : सातारा शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतीच्या परिसरातील रस्ते अतिशय खराब आहेत. नाल्यांची दुरवस्था असल्याने स्थानिक जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून, याठिकाणी सातारा पालिकेने सोयी-सुविधा द्याव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.
.......
शाहुनगरमध्ये स्वच्छता
सातारा : सातारा पालिकेतर्फे शाहुनगर येथील त्रिशंकू भागामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याचे काम सुरू केले आहे. पालिकेने या भागातील नालेसफाई सुरू केलेली आहे. झाडे, वेली देखील स्वच्छ करून घेण्यात येत आहेत. खासगी मालकीच्या मोकळ्या प्लॉटमध्ये स्वच्छता करताना मात्र अनेक अडचणी येत आहेत.