पळशी : माण तालुक्यात शनिवारी दुपारपासून सोसाट्याचे वारे वाहत असून, पळशी, मार्डीसह परिसरात संध्याकाळी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, तर काही ठिकाणी शेडवरील पत्रे उडून गेली.
मेघगर्जनेसह अचानक शनिवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली. येथील अनेक शेतकऱ्यांनी विक्रीसाठीचा कांदा बाहेर वाळवायला पसरवला होता. अचानक आलेल्या पावसामुळे कांदा झाकण्यासाठी धावपळ उडाली. त्यातच सोसाट्याच्या वाऱ्यास सुरुवात झाल्याने कांद्यावर झाकलेले प्लास्टिकही उडून गेल्याने कांद्याचे नुकसान झाले.
वाऱ्याचा व पावसाचा वेग वाढल्याने परिसरातील अनेक झाडांच्या फांद्या मोडल्या, तर मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. परिसरात पाऊस कमी, वाराच जास्त, अशी परिस्थिती निर्माण झाली असून, बऱ्याच ठिकाणी जनावरांसाठी चारा म्हणून वापरले जाणारे कडवळ पीक शेतातच आडवे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, तसेच आंब्याच्या झाडावरील आंबे वाऱ्याने पडल्याने विक्रीसाठी तयार आंब्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे फळबाग शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून संध्याकाळच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटत असून, हलक्या पावसाच्या सरी येत आहेत. रविवारीही दिवसभर वेगाने वारे वाहत होते.
फोटो : १६ पळशी
पळशी (ता. माण) परिसरात सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे उन्मळून पडली आहेत.