वाई : ‘युवकांनी इतिहास समजून घ्यावा, अंगी आत्मविश्वास निर्माण व्हावा, कोणत्याही प्रकारचे संकट आले तरी त्याला धैर्याने सामोरे जाता यावे, म्हणून योद्धा प्रतिष्ठान साहस ट्रेकिंगचे आयोजन करते,’ अशी माहिती रणवीर गायकवाड यांनी दिली.
वाई येथील योद्धा प्रतिष्ठानच्या युवकांनी ठाणे जिल्ह्यातील भैरवगड सर केला. यावेळी तरुणांशी संवाद साधताना ते बोलत होते. यामध्ये प्रतिष्ठानचे रणवीर गायकवाड, अक्षय पवार, तुषार घोरपडे, सचिन कचरे, दिलीप रवळेकर, सोहम घोरपडे, प्रसाद सोनावणे, संकेत कदम, सार्थक गायकवाड असे नऊजण वाईहून निघाले. नारायणगाव, जुन्नर मार्गे माळशेज घाट उतरून पहाटे साडेचार वाजता भैरवगडाच्या पायथ्याच्या मोरोशी या गावात येऊन पोहोचले. भैरवगडाचा बालेकिल्ला अशाच मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या डाईकवर बेसाल्ट खडकांच्या चारशे फूट उंच सरळसोट भिंतीवर बनवलेला आहे.
भैरवगडाच्या माथ्यावर योध्द्यांनी भगवा ध्वज फडकवून या अशा धाडसी मोहिमांचे प्रेरणा व ऊर्जास्त्रोत असणारे छत्रपती शिव-शंभूंचे स्मरण व वंदन करून या विशाल, अफाट, महाकाय अशा सह्याद्रीसमोर नतमस्तक होऊन खाली उतरायला सुरुवात केली. जिथे ओव्हरहँग पॅच क्लाईम्ब केलं होतं, तिथून आता रॅपलिंग करत एकेक जण उतरले आणि पुन्हा एकदा सभोवतालच्या परिसराला डोळ्यात साठवून घेतले आणि प्रचंड असा भैरगड सर केल्याने एक वेगळा आत्मविश्वास सर्वांमध्ये निर्माण झाला.
चौकट :
दीडशेहून अधिक मोहिमा
गेल्या दहा वर्षांमध्ये सत्तर गड-किल्ल्यांवर दीडशेहून अधिक ट्रेक केले आहेत. सर्वात खडतर-अवघड समजल्या जाणाऱ्या दुर्गांपैकी कलावंतीण दुर्ग, अलंग-मदन-कुलंग, कळकराय सुळका, तैलबैला, लिंगाना अशा अनेक कातळारोहणाच्या मोहिमा यशस्वीपणे सर केल्या आहेत.
राजगड ते तोरणा, अंधारबन, रायरेश्वर ते नाखिंद, कोळेश्वर-जोर-भैरीची घुमटी, वाई ते मांढर्देव अश्या अनेक पायी मोहिमा यशस्वी केल्या आहेत.
फोटो ०८वाई-ट्रेकिंग
वाई येथील योद्धा प्रतिष्ठानच्या तरुणांनी भैरवगड सर करून मोहीम यशस्वी केली.