प्रगती जाधव-पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : घरात अत्यवस्थ कोरोना रुग्ण बघून कुटुंबीयांचा झालेला थरकाप... तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी सुरू असलेली धडपड... हाउसफुल्ल सेंटरमध्ये बेड मिळत नसल्याने येणारी हतबलता आणि दोन-तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बेड मिळाल्याचा दिलासा... भाव भावनांचा हा खेळ कोरोना रुग्णालय आवारात घडतंय बिघडतंयच्या हिंदोळ्यावर रोज सुरू आहे.
काल-परवापर्यंत कोविड हे खोटं आहे, असं म्हणणाऱ्या अनेकांना त्याच्या अस्तित्वाची भयावह जाणीव झाली आहे. अत्यावस्थ असलेल्या बाधित स्वकीयाला रुग्णालयात दाखल करण्याची लगबग, बेड नाही म्हटल्यावर येणारी हतबलता, सगळं व्यवस्थित होईल, अशी स्वत:च स्वत:ची काढलेली समजूत आणि बेड मिळेपर्यंत रुग्णाला खुर्चीवर बसवून तीन दिवस प्रतीक्षा करणारे नातेवाईक पाहिले की, कोविडची भीषणता अक्षरश: हादरवून सोडते.
शासकीय रुग्णालय नको, त्यापेक्षा आपण ‘प्रायव्हेट’ला जाऊ, असं म्हणणाऱ्यांची विमानं आता शिस्तीत जमिनीवर आली आहेत. जंबो कोविड सेंटर आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल होण्यासाठी दणकेबाज वशिले लावण्याची वेळ आली आहे. पैसे नसल्यामुळे खासगीवाले दारात उभे करेनात अन् दांडगा वशिला नसल्यामुळे सरकारी दवाखान्यात व्हरांड्यातून आत घेईनात. अशांसाठीही या आवारात माणुसकी धावून येत असल्याचं ‘पॉझिटिव्ह’ चित्र पाहायला मिळतंय. आजची परिस्थिती सुखाची नसली, तरी माणुसकी अजून टिकून आहे, ही आशादायक बाब वाटते.
चौकट :
प्रशासनाच्या वशिलेबाजीचा हैदोस...!
जंबो कोविड सेंटर जिल्ह्यातील गरिबांसाठी मोफत सोय होण्याचं ठिक़ाण आहे. गरीब गरजूंना येथे उपचार सेवा मिळणं अपेक्षित असताना, येथे यायला हल्ली वशिल्याची कुबडी लागत आहे. आर्थिक व राजकीय सधनतेच्या जोरावर निव्वळ भीतिपोटी कोविड सेंटरमध्ये बेड अडवून बसणाऱ्या महाभागांना वशिल्यावर बेड मिळतोय. कधी नेता-पदाधिकारी, कधी अधिकारी तर कधी ‘लक्ष्मी प्रसन्न’ या निकषावर प्रवेश देण्याचे चाललेले उद्योग माणुसकीला काळिमा फासणारे आहेत.
कोरोनाग्रस्त आईला झप्पी अन् पप्पी!
रुग्णांबरोबर येणारे नातेवाईकही जाम घाबरलेले असतात. परस्परांना धीर देण्यासाठी आणि तुला काहीही झालेलं नाही, हे सिद्ध करण्यासाठी ते रुग्णाच्या अगदी जवळ जाऊन बसतात. जावळी भागातून आईला घेऊन आलेल्या एका महिलेने आई, तुला काहीच नाही झालं, तू नक्की बरी होशील, म्हणत चक्क पप्पी आणि झप्पी घेतली. काही वयस्क रुग्णांना धाप लागल्याने, अन्न खाणंही कठीण होतंय, अशा लोकांना मुलं आणि नातवंडे अन्न भरवतात, नातेवाइकांचे हे प्रकार कोरोनाचा प्रसार वाढविणारे ठरत आहेत.
कोविड डिफेंडर ग्रुप जागल्याच्या भूमिकेत!
सुखवस्तू कुटुंबातील अनेकांचे हात माणुसकीच्या भावनेतून या आवारात स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत. सातारा कोविड डिफेंडर ग्रुपच्या वतीने सेंटरच्या बाहेरील नातेवाइकांना मार्गदर्शन केले जाते. ग्रुपचे विनित पाटील, प्रशांत मोदी, पंकज नागोरी, असिफ खान, सागर भोसले, रवि पवार, विकास बहुलेकर आदींसह जयश्री शेलार याही येणाऱ्या नातेवाइकांसाठी संकटमोचक ठरल्या आहेत. प्रशासनाला समजावून तर कधी आक्रमक होऊन ही टीम लढत आहे.
कोट :
अखिल मानवावर आलेले संकट निश्चित जाणार आहे. यात अडकलेल्यांची होणारी तडफड बघवत नाही. आपल्या परीने होईल ती मदत करण्याचं ठरवून मी काम करतोय. रोज काही तास ही सेवा केल्याने आत्मिक समाधान आणि मनुष्य म्हणून संवेदनशीलपणे जागृत असल्याचं सुख अनुभवता येतं.
- सागर भोसले, सातारा कोविड डिफेंडर ग्रुप