प्रमोद सुकरेकराड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कराड येथे मंगळवारी काँग्रेसच्या वतीने तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, रयत कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, कराड तालुका अध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजीत चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून या पदयात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर ही पदयात्रा हुतात्मा स्मारकात पोहोचली. तेथे मान्यवरांनी हुतात्म्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यानंतर ही पदयात्रा मलकापूर, मुंढे, वारुंजी, वनवासनाची या गावांना रवाना झाली. भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महात्मा गांधी यांनी शांततेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनाला भारतीयांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाले. पण आज स्वातंत्र्याची फळे चाखणाऱ्या युवा पिढीने इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवताना क्रांतिकारकांनी काय वेदना सोसल्या आहेत, जो त्याग केला आहे तो जाणून घेणे गरजेचे आहे.
कराडात काँग्रेसच्या तिरंगा पदयात्रेला उस्फूर्त प्रतिसाद, पृथ्वीराज चव्हाणांनी युवा पिढीला केलं 'हे' आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 1:52 PM