रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती करण्याला प्राधान्य दिले आहे. शहरात ठिकठिकाणी ठेवलेल्या या आकर्षक कलाकृती शहराच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेच्या माध्यमातून रहिमतपूर नगरपालिकेमार्फत विविध स्तुत्य उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ कलाकृतींच्या निर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे. येथील कचरा डेपो, गौळोबा माळ व पाणी पुरवठा केंद्र येथे जुन्या टाकाऊ लोखंडी पाइप, पत्रा, अँगल, बेअरिंग आदी साहित्यापासून कल्पकतेने वेगवेगळ्या टिकाऊ वस्तूंची निर्मिती करण्यात आली आहे.
शहर सुशोभीकरणासाठी भंगार लोखंडी वस्तूंपासून रणगाडा, मिसाइल, रॉकेट, तोफ, ढाल, तलवार, बंदूक, सायकल, सफाई कामगार मित्र शिल्पकृती तयार करण्यात आलेल्या आहेत. शहरातील बसस्थानकाजवळील चौकामध्ये दर्शनी ठिकाणी रणगाडा, रोकडेश्वर मंदिरासमोर मिसाइल, रस्त्याच्या बाजूने हत्ती, वाघ, हरिण, बैल, घोडा, उंदीर, कोंबडी, बदक, पेग्विन आदी कलाकृती विविध ठिकाणी बसवण्यात आल्या आहेत. तसेच जुन्या टायरपासून विविध प्रकारचे प्राणी व पक्षी यांची कलाकृती तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये हत्ती, वाघ, हरिण, बैल, घोडा, उंदीर, मासा, कोंबडी, बदक, पेग्विन पक्षी, फुलपाखरू अशा विविध आकर्षक वस्तू तयार करण्यात आलेल्या आहे.
चौकट :
सोनेरी कलाकृतीने सौंदर्यात भर
स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत शहर सुशोभीकरणाच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. टाकाऊपासून टिकाऊ बनवलेल्या सोनेरी कलाकृतीमुळे शहराच्या सौंदर्यात निश्चित भर पडेल. आगामी काळातही विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर आमचा भर राहील, असे आश्वासन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने व नगराध्यक्ष आनंदा कोरे यांनी दिले.
फोटो : १२ जयदीप जाधव
फोटो : रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे टाकाऊपासून निर्मिती केलेल्या टिकाऊ कलाकृती शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. (छाया : जयदीप जाधव)