आॅनलाईन लोकमतम्हसवड (जि. सातारा), दि. १८ : दहिवडी येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात वीज ग्राहकांच्या विविध आडचणी व समस्यांचे जागेवरच निवारण करण्यासाठी ग्राहक संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाचा शेकडो वीज ग्राहकांनी लाभ घेतला. यावेळी ५९ ग्राहकांच्या वीज बिलांची दुरुस्तीही करण्यात आली.
माण तालुक्यातील ग्राहकांची वीजबील दुरुस्ती, कृषी पंपांची नविन वीज कनेक्शन मागणी, वीजपुरवठ्या संदर्भात अडचणी, नावात बदल, नावात दुरुस्ती, घरगुती वीजजोडणी यासह अनेक विविध समस्या सोडवण्यात आल्याने नागरिकांचा वेळ व पैशाची बचत झाली आहे. महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयाने ग्राहक संपर्क अभियानात ५९ ग्राहकांच्या वीज बिलांची दुरुस्ती केली. तर तांत्रिक विभागाकडे आलेल्या तक्रारींचा जागेवरती निपटारा करुन अनेक तक्रारी निकालात काढण्यात आल्या. तसेच कृषी पंपांच्या १० नवीन कनेक्शनसाठी नवीन मिटर जागेवरच देण्यात आले.
महावितरण कंपनीच्या वतीने घेण्यात आलेले ग्राहक संपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी कार्यकारी अभियंता ए. पी. यादव, अतिरिक्त कार्यकारी अभियंता एच. एन. ढोक, उपकार्यकारी अभियंता लोंढे यांच्यासह सहाय्यक अभियंता सी. एच. रेड्डी, डी. ए. पवार, आर. जी. देशमुख, पी. ए. पोळ, एच. पी. पाटील, एस. पी. रजपूत, कनिष्ठ अभियंता आर. ए. सानप, लेखा सहाय्यक ए. के. जगदाळे, कनिष्ठ सहाय्यक अर्जून सपकाळ यांनी प्रयत्न केले.
म्हसवडमध्येही अभियान...
म्हसवड शहर शाखेंतर्गत वीज ग्राहकांच्या विविध समस्या व अडचणी सोडविण्यासाठी येथील कार्यालयाच्या वतीने बुधवार, दि. १९ रोजी कार्यालयात ग्राहक संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. वीज ग्राहकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाखा अभियंता सी. एच. रेड्डी यांनी केले आहे.