उंब्रज - संकेश्वर येथील कत्तलखान्यात 14 बैल घेऊन जाणारा ट्रक रविवारी सकाळी उंब्रज येथे गोरक्षकांनी पकडला. त्यांनी ट्रकसह 14 बैल पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिसांनी बेकायदा वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. याबाबत फिर्याद हिंदू एकता आंदोलनचे कराड उत्तरचे अध्यक्ष महेश जयवंत जाधव (रा. उंब्रज, ता. कराड) यांनी दिली आहे.
गोरक्षणाचे काम पाहणारे शिवशंकर स्वामी यांचा जाधव यांना फोन करून ‘मी पुण्यावरून कोल्हापूरकडे जात आहे. माझ्यासमोर असलेल्या ट्रकमध्ये ( एमएच 11 बीके 2002) बैल भरण्यात आले आहेत. संबंधित ट्रक सातारा बाजूकडून कराड बाजूकडे निघाले आहे अशी माहिती दिली. या माहितीनुसार, महेश जाधव, विक्रम सुरेश माने, राहुल माणिक जाधव, सचिन शिवाजी जाधव हे सर्वजण उंब्रजच्या तारळी पूल येथे थांबले. सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान सातारा बाजूकडून उंब्रजकडे येणारा संबंधित ट्रक दिसला. त्यास यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु चालकाने ट्रक थांबविला नाही. तसाच पुढे नेला म्हणून गोरक्षकांनी पाठलाग करून ट्रक उंब्रज येथील बसस्थानकासमोर थांबवला. या ट्रकच्या हौद्यामध्ये दाटीवाटीने 14 बैल भरण्यात आलेले दिसून आले.
14 बैलांना ट्रकसह उंब्रज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. उंब्रज पोलिसांनी ट्रकचालक जुबेर इस्माईल बेपारी, तौसिक मुनीर कुरेशी (रा. सदर बझार सातारा), नाना किसन मोहिते (रा. नागठाणे, ता. सातारा) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत उंब्रज पोलिसात फिर्याद दाखल झाली असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले हे करत आहेत.