घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाड ते मलकापूर-नांदलापूर या बैल बाजार रस्त्यावर खरेदी-विक्री संघाचा पेट्रोलपंप आहे. पंपासमोरच रस्त्यावर जागा असल्यामुळे अनेकवेळा मालवाहतुकीचे ट्रक याठिकाणी उभे केले जातात. मंगळवारी दुपारीही प्लॅस्टिक साहित्यासह कचरा भरलेला ट्रक त्याठिकणी उभा होता. ट्रक रस्त्यावर लावून चालक बाजूला गेला होता. या ट्रकमध्ये भरलेल्या प्लॅस्टिकसह इतर कचऱ्याने अचानक पेट घेतला. ही बाब पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी पंपावर असलेल्या आग विझवण्याच्या सिलिंडरने फवारे मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र भर दुपारची घटना असल्याने आणि ट्रकमध्ये प्लॅस्टिक कचरा भरलेला असल्याने आग विझवताना अडचणी निर्माण होत होत्या.
दरम्यानच्या कालावधीत काही नागरिकांनी पालिकेच्या अग्निशामक दलाला संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यामुळे काही वेळातच पालिकेच्या अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणली. मात्र, ट्रकमध्ये प्लॅस्टिक कचरा भरलेला असल्याने आग उशिरापर्यंत धुमसत होती. या घटनेने परिसरातील काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.