सातारा : येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या ब्रिटानिया कंपनीसमोर एका ट्रकचालकाला मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मंगळवार, दि. २९ जून रोजी घडली असून, त्याची तक्रार शुक्रवार, दि. २३ जुलै रोजी दाखल झाली आहे. या तक्रारीनंतर राजेश शेडगे, तुषार शेडगे, श्रेयस माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, विनायक मच्छिंद्र मेटकरी (वय २६, रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा) हे ट्रकचालक असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची आणि राजेश शेंडगे, तुषार शेंडगे आणि श्रेयस माने (सर्व रा. धनगरवाडी, ता. सातारा) या तिघांची भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरुन या तिघांनी मिळून विनायक यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत विनायक यांचा उजवा हात खांद्यातून निखळला असून, डाव्या पायाला मुका मार लागला आहे. या मारहाणीत संशयित तिघांनी ट्रकवर दगड फेकून काचा फोडल्या आणि ट्रकचे नुकसान केले.
याप्रकरणी विनायक यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर राजेश शेंडगे, तुषार शेंडगे आणि श्रेयस माने यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, तिघांनाही रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.