पाली : मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील चरवेली येथे एका अवजड ट्रकने चार दुचाकींना ठोकर दिल्याने एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर पाच जण जखमी झाले. तिघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले आहे. त्यात एका पाच वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. श्रीकांत सत्यवान कुंभार (वय २७, कुंभारवाडी, लांजा) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही दुर्घटना सोमवारी सकाळी ११.३० वा.च्या दरम्यान घडली.या अपघातात साईराज चंदू कोळंबेकर (१८, लांजा), एकनाथ नारायण शिंदे (३०), नाथा दादाराव जगताप (२५), ज्ञानेश्वर मारुती शिंदे (३२), दीक्षिता ज्ञानेश्वर शिंदे (५, सर्व राहणार ओझर खुर्द, ता. जामनेर, जिल्हा जळगाव) हे जखमी झाले आहेत. यातील नाथा, ज्ञानेश्वर आणि दीक्षिता यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले आहे.जयगडहून कोळसा भरून कर्नाटकच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा एक १४ चाकी मालवाहू ट्रक (केए २८ सी ३९३७) चरवेली येथील नागले यांच्या दुकानासमोरील वळणावर आला असता पालीहून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या चार दुचाकींना ठोकरून उलटला. या अपघातात लांजाहून रत्नागिरीकडे जाणारा श्रीकांत सत्यवान कुंभार याचा जागीच मृत्यू झाला. ट्रक त्याच्याच अंगावर पलटी झाल्याने तो ट्रकखाली अक्षरश: चिरडला गेला. त्याचा मित्र साईराज चंदू कोळंबेकर हा जखमी झाला. तेथेच दुचाकीने पालीहून चिपळूणकडे जाणाºया तीन दुचाकीस्वारांनाही या ट्रकने ठोकरले. त्यात एकनाथ शिंदे, नाथा जगताप, ज्ञानेश्वर शिंदे आणि त्यांची मुलगी दीक्षिता (सर्व राहणार ओझर खुर्द, ता. जामनेर, जि.जळगाव) हे जखमी झाले. ते भविष्य सांगणारे असून, त्यांचे बाकी साथीदार पुढे गेले होते.हा अपघात घडताच महामार्ग पोलीस व पाली दूरक्षेत्राचे पोलीस यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली व वाहतुकीवर नियंत्रण मिळविले. जखमींना तातडीने नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त ट्रकचा चालक फरार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे.
ट्रकने चार दुचाकींना ठोकरले; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 11:13 PM