येराड येथील नारायण साळुंखे हे ट्रकवर चालक आहेत. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ते ट्रक (क्र. एमएच ११ एम ५४४९) गुहाघर-विजापूर महामार्गानजीक उभा करून घरी गेले. रात्री १२ वाजेच्या सुमारास ट्रकमधून धूर व आगीच्या ज्वाळा बाहेर पडत असल्याचे ग्रामस्थ सुनील साळुंखे व इतरांना दिसले. त्यांनी तातडीने ग्रामस्थांना जागे करून आगीची माहिती दिली. काही वेळातच आगीने उग्ररूप घेतल्याने ट्रकजवळ जाण्यास कोणीही धजावत नव्हते. याचदरम्यान कोयना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी हे पाटणहून कोयनेकडे जात होते. आग निदर्शनास येताच त्यांनी त्यांचे वाहन थांबविले. कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थ व पोलीस कर्मचाऱ्यांनीही मिळेल तेथून पाणी आणून आग नियंत्रणात आणली.
भरवस्तीत ट्रकला आग लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, सहाय्यक निरीक्षक चंद्रकांत माळी व सहकाऱ्यांनी तत्परता दाखवत आग विझविली. परिणामी, मोठा अनर्थ व आर्थिक नुकसान टळले. या घटनेची पाटण पोलीस ठाण्यात नोंद झाली असून हवालदार आर. व्ही. पगडे तपास करत आहेत.
फोटो : १४केआरडी०५
कॅप्शन : गुहाघर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर येराड, ता. पाटण येथे उभ्या ट्रकला अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. (छाया : निलेश साळुंखे)