लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : ट्रक व एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात पंचवीस जण जखमी झाले. हा अपघात फलटण-पंढरपूर मार्गावरील पिंप्रद हद्दीत मंगळवारी सकाळी साडेअकराला झाला. यामध्ये चालकासह पाचजण गंभीर जखमी झाले. जखमींवर खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड आगाराची विजापूर-पिंपरी-चिंचवड एसटी (एमएच १४ बीटी ३१८२) पिंपरी-चिंचवडकडे निघाली होती. त्याचवेळी फलटणकडून पंढरपूरकडे निघालेला ट्रक (एमएच २५ यू ११६६) पिंप्रद हद्दीत आला असता एसटी व ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही चालकाच्या बाजूला धडकल्याने एसटी व ट्रक एकमेकांत घुसले. पुढील दहा फुटांपर्यंत बाजू फाटत गेली. यामध्ये दोन्ही चालक अडकले होते.ट्रक चालक शुभम पोपट रणपिसे (वय २३, रा. गोंदवले बुद्रुक, ता. माण), एसटी चालक रवींद्र दादासाहेब जाधव (५४, रा. जवळार्जन ता. पुरंदर) यांचे डोके, हात-पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे. जयश्री छबूराव भोसले (५०), नंदा भन्सीलाल भोसले (३५), महादेव संभाजी भोसले (७०, तिघे रा. शिंदेवाडी), सदानंद एकनाथ गावडे (६१, रा. पंढरपूर), चिद्दशील मारुती लोढे (१७, रा. बरड), विलास दामोदर थोरात (५८, रा. अकलूज), हरिदास अर्जुन सकट (३७, रा. तांबे), यशवंत आनंद खानविलकर (८३, रा. मंगळवेढा), वाहक तुकाराम शत्रुघ्न भोसले (४०, रा. विजापूर) यांचे डोके, हात-पाय, नाकाला दुखापत झाली. काही प्रवाशांना मुक्कामार लागला आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.कार झाडावर आदळून चार जखमीफलटण : फलटण-पंढरपूर मार्गावर विडणी, ता. फलटण गावच्या हदीत पुण्याकडे जाताना चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडावर आदळली. या अपघातात एकजण गंभीर असून, इतर तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून चौघेजण पुण्याकडे जात होते. यावेळी कार झाडावर आदळून एकजण गंभीर तर तिघेजण किरकोळ जखमी झाले. या जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ट्रक धडकेत एसटीचा सांगाडा उचकटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:47 AM