सातारा : सातारा पालिकेतील विद्यमान सभापतींची मुदत दि. ३ जानेवारीला पूर्ण होत असून, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी नूतन सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सोमवारी (दि. ११) सभापती निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा शहराची नुकतीच झालेली हद्दवाढ व दहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पालिका निवडणुकीमुळे खासदार उदयनराजे भोसले नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी देणार? की जुुन्यांनाच मुदतवाढ देणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सातारा पालिकेत खा. उदयनराजे भासले यांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. गेल्या चार वर्षांच्या कालावधीत खा. उदयनराजे यांनी आघाडीतील काही अनुभवी तर काही नव्या चेहऱ्यांवर सभापती व उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. प्रत्येकाने आपापल्यापरीने शहर विकासात योगदान दिले. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. सातारा शहराची नुकतीच हद्दवाढ झाली आहे. त्यामुळे वाढीव भागात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी अनेक राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे शिवाय पालिकेची निवडणूकही दहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मतदारांच्या नगरसेवकांकडून अपेक्षाही वाढल्या आहेत. या सर्वांना सारासार विचार करता खा. उदयनराजे भोसले काय निर्णय घेतायत? याचे उत्तम मात्र गुलदस्त्यात आहे.
विद्यमान पाणीपुरवठा सभापती यशोधन नारकर, नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, बांधकाम सभापती मिलिंद काकडे व महिला बालकल्याण सभापती सुनीता पवार यांच्या सभापतिपदाची मुदत दि. ३ जानेवारीला संपत आहे. त्यामुळे प्रांतांकडून नूतन सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता पालिकेची विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. या ऑनलाईन सभेत विषय समिती व स्थायी समितीच्या रिक्त पदांसाठी सदस्यांचे नामनिर्देशन करणे, नामनिर्देशित सदस्यांमधून सभापती व शिक्षण समितीच्या पदसिद्ध सभापतींची निवड केली जाणार आहे. ही सभा कोणत्याही परिस्थितीत तहकूब होणार नाही, असे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी कळविले आहे. दरम्यान, सभापती निवडीचा बिगुल वाजल्याने इच्छुकांकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.
(चौकट)
असा आहे कार्यक्रम
समिती सदस्यसंख्या माहिती देणे : ११ वाजता
उमेदवार नामनिर्देशन पत्र स्वीकारणे : ११ ते ११.३०
प्राप्त अर्ज छाननी : ११.३० ते ११.४५
उमेदवारी अर्ज मागे घेणे : ११.४५ ते दुपारी १२
समितीच्या उपसभापतिपदासाठी अर्ज स्वीकारणे : १२ ते १२.१५
उमेदवारी अर्ज माघारी : १२.१५ ते १२.३०
सभापती निवड : १२ .४५
सभापती निवड घोषणा : दुपारी १ वाजता
फोटो : सातारा पालिका