उंब्रज : येथील आयसीआयसीआय बँकेचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाला तसेच अज्ञातांकडून बँकेचे एटीएम सेंटर फोडण्याचा प्रयत्न झाला. यावेळी चोरट्यांशी झालेल्या झटापटीत वॉचमन किरकोळ जखमी झाला. पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत सुरेश दिनकर सोनवले (रा. तारगाव, ता. कोरेगाव) यांनी उंब्रज पोलिसांत फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कऱ्हाड तालुक्यातील उंब्रज येथील सेवा रस्त्यालगत असणाऱ्या कोळी प्लाझा या इमारतीत पहिल्या मजल्यावर आयसीआयसीआय बँकेची शाखा आहे. सेवारस्त्याला लागूनच या बँकेचे एटीएम सेंटर आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास वॉचमन सुरेश सोनवले यांनी जेवण झाल्यानंतर एटीएम सेंटर व बँकचे शर्टरचे लॉक चेक करून ते बँकेच्या शटरजवळ गॅलरीत थांबले होते. पहाटे चारच्या सुमारास गेटमधून कोणी तरी आत येत असल्याचा तसेच शटरचा आवाज आला. त्या सुमारास त्यांनी हातात लोखंडी पाईप घेऊन पुढे येणाऱ्यावर उगारली. यावेळी चोरट्यांनी वॉचमनवर हल्ला केला. झालेल्या झटापटीत त्यांनी वॉचमनच्या बॅगेतील चाव्या व मोबाईल काढून घेऊन शटर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र सोनवले यांना हाताला दुखापत झाली, त्यामुळे ते घाबरले. सोनवले यांनी आरडाओरडा केल्याने चोरटे तेथून गायब झाले. थोड्या वेळानंतर सोनवले यांनी खाली येऊन एटीएम सेंटर चेक केले असता एटीएम सेंटरचाही पत्रा उचकटल्याचे लक्षात आले. चोरटे हिंदीतून बोलत होते. अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटाचे दोघेजण तोंडाला मास्क लावून शटर उचकटण्याचा प्रयत्न करत होते. वॉचमन सोनवले यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ‘त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, तसेच यावेळी झालेल्या झटापटीत सोनवले यांच्या हाताला जखम झाली आहे. याबाबत उंब्रज पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार जगताप करीत आहेत. (प्रतिनिधी)
एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न
By admin | Published: February 26, 2017 12:35 AM