दीपक शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: राज्यातील सहकारी साखर कारखानदारी सुवर्णकाळातून जात असताना अली बाबा आणि ४० चोरांनी त्यांची लूट सुरू केली आहे. सहकारी कारखानदारीला खासगीकरणाच्या मधाचे बोट लावून अडचणीत आणण्याचा प्रकार सुरू आहे. खासगी कारखान्याची गाळप क्षमता वाढवून सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊसच गायब करण्याचे प्रकार होत आहेत. सहकारी कारखाने वाचावेत म्हणून प्रयत्न करणारे राजकारणी आणि ते मोडून खाणारेही राजकारणी अशी राजकारणीतील नवी पिढी उदयास आल्याने राज्यातील सहकारी साखर कारखानदारी माफियांच्या ताब्यात निघाली आहे.
सहकार चळवळ वाचली पाहिजे...शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले पाहिजेत म्हणून सहकारी साखर कारखाने सुरू झाले. ते वाढले आणि चार पैसे शेतकऱ्यांच्या हातात पडू लागले. पण, अलीकडे सहकारी साखर कारखानदारी संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. दम असेल त्यांनी साखर कारखाना चालवावा, असे आव्हान देणाऱ्या राजकारण्यांनी शेतकऱ्यांच्या नाकात दम आणला तर त्यांच्या नाकातही दम आणायला शेतकऱ्यांना वेळ लागणार नाही. सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात नवीन खासगी कारखान्याला परवानगी द्यायची आणि त्या कारखान्याने चार पैसे अधिक देण्याचा प्रयत्न करत मूळच्या कारखान्याला जेरीस आणायचे, असा प्रकार सध्या सुरू आहे. त्याच्याही पुढे जाऊन एखादा कारखाना अडचणीत आणायचा आणि त्याठिकाणी कमी पैशात तो विकत घेऊन खासगीकरणातून चालवायचा, असा प्रयत्नही सुरू आहे.
२००८ मध्ये राज्यात एकूण ११६ सहकारी साखर कारखाने आणि केवळ २८ खासगी साखर कारखाने होते, तर २०१८ मधील परिस्थिती पाहिली. तर, सहकारी साखर कारखाने राहिले १०१ आणि खासगी साखर कारखाने ८७ झाले आहेत. एका बाजूला सहकारी साखर कारखाने बंद पडत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला खासगी साखर कारखान्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भविष्यात सहकारी साखर कारखानदारी अडचणीत येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २० वर्षांत नवीन सहकारी तत्तावरील साखर कारखाना उभा न राहता उभे राहिलेले कारखाने बंद पडले, पण त्याचवेळी खासगी साखर कारखाने मात्र नव्याने सुरू झाले हेही लक्षात घेतले पाहिजे. उत्पादकता वाढली आहे, मात्र सहकारी कारखान्यांची उत्पादकता कमी होऊन (रिकव्हरी) कारखाने अडचणीत आले. काही राजकारण्यांनी जाणीवपूर्वक कारखाने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.
काही सहकारी कारखाने खरोखर चांगलेच
सहकार चळवळ अडचणीत असताना काही सहकारी साखर कारखाने खरोखरच चांगले चालले आहेत. सातारा जिल्ह्यातील सह्याद्री, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, दत्त सहकारी साखर कारखाना, सांगली जिल्ह्यातील हुतात्मा साखर कारखाना हे कारखाने चांगले आहेतच. त्याबाबत कोणीही शंका घेणार नाही; पण या कारखान्यांच्या परिसरातदेखील खासगी साखर कारखाने सुरू होत आहेत. काही ठिकाणी सुरू झालेही आहेत. त्यामुळे या कारखान्यांनाही अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
खासगी कारखान्यांची स्पर्धा जीवघेणी
सहकारी साखर कारखान्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून बसलेले बस्तान उठविण्याचा प्रयत्न करणाऱ्या साखर कारखान्यांनी भांडवल आणि दराबाबत स्पर्धा करायला सुरुवात केली आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत असले तरी भविष्यात एकदा सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आली आणि कारखाने बंद झाले, तर शेतकऱ्यांनाही खासगी साखर कारखानदारांच्या मनमानीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सहकारी कारखानदारीही टिकली पाहिजे. अन्यथा, खासगी कारखान्यांशी स्पर्धा करणे आणि त्यामध्ये टिकून राहणे अवघड होणार आहे.
सहकारी कारखान्यांना कर्जपुरवठा
ऊस गाळप झाल्यानंतर साखरेची विक्री होण्यासाठी वेळ लागतो. मात्र, तोपर्यंत कारखान्यांना नवीन हंगाम सुरू करण्यासाठी कर्जाची आवश्यकता असते. अलीकडे बँका राजकारण्यांच्या ताब्यात गेल्यामुळे एखाद्या कारखान्याला बँक हमी न देण्याचे षड्यंत्र राबविले जात आहे. ज्यांचे सरकार असेल त्यांनी विरोधातील पार्टीच्या साखर कारखान्याला बँक हमी किंवा इतर मदत करायची नाही, असेच धोरण ठेवल्यामुळे कारखान्यांना कर्जपुरवठा होत नाही.
राज्यातील सहकारी खासगी कारखाने
विभाग सहकारी खासगीकोल्हापूर २६ ११पुणे ३० ३२नगर १७ १०औरंगाबाद १४ १०नांदेड १४ १८अमरावती ० २नागपूर ० २