सातारा : गणेशमूर्ती व दुर्गादेवी विसर्जनासाठी पालिकेला दरवर्षी लाखो रुपये खर्च करावे लागत आहे. हा खर्च पालिकेला न परवडणारा आहे. सध्या मूर्ती विसर्जनासाठी मंगळवार तळे, मोती तळे व फुटका तलाव या पारंपरिक तळ्यांशिवाय पालिकेकडे दुसरा कोणताच पर्याय नाही. त्यामुळे या तळ्यांमध्येच मूर्ती विसर्जनासाठी परवानगी देण्यात यावी, अशी पुनर्विचार याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्याचा निर्णय पालिकेच्या विशेष सभेत सर्वानुमते संमत करण्यात आला.
नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. २९) पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, आरोग्य सभापती यशोधन नारकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती अनिता घोरपडे, मागासवर्गीय कल्याण समिती सभापती संगीता आवळे, नगरसेवक वसंत लेवे, अशोक मोने आदी उपस्थित होते.
या विशेष सभेत विसर्जन तळ्याचा एकमेव मुद्दा अजेंड्यावर घेण्यात आला होता. सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी कृत्रिम तळे व पारंपरिक तळ्यावर आपापली मते मांडली. नगरसेवक अॅड. दत्तात्रय बनकर म्हणाले, ‘सुशांत मोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून शहरातील पारंपरिक तळ्यात मूर्ती विसर्जन करण्यास मनाई करावी,’ अशी मागणी केली होती. तत्कालीन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनीही या तळ्यात विसर्जनास बंदी करण्यात आल्याचे म्हणणे न्यायालयापुढे मांडले. त्यानुसार उच्च न्यायालयाने ही याचिका निकालात काढली.
वास्तविक तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी सभेपुढे हा विषय न आणता परस्पर आपले म्हणणे सादर केले. त्यामुळे पालिकेला गेल्या तीन वर्षांपासून कृत्रिम तळ्यावर अवाढव्य खर्च करावा लागत आहे. दरवर्षी ३२ लाख असे तीन वर्षांत ९६ लाख रुपये कृत्रिम तळ्यांवर खर्ची झाले आहेत.
विसर्जन कालावधीत पालिकेचे ५० ते ६० कर्मचारी याच कामात गुंतून राहतात. याचा पालिकेच्या दैनंंदिन कामावर विपरित परिणाम होतो. वरील सर्व बाबींचा विचार करून शहरातील पारंपरिक तळीच मूर्ती विसर्जनासाठी योग्य असून, न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात यावी, नियामक मंडळाने घालून दिलेल्या अटी व नियमांनुसार मूर्तींचे विसर्जन केले जाईल, उत्सवानंतर तळी स्वच्छ केली जातील, प्रदूषण होणार नाही, याचा दक्षता घेतली जाईल, असा ठराव यावेळी सर्वानुमते संमत करण्यात आला. न्यायालयाच्या निर्णयानंतर तळ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.जिल्हाधिकाºयांचे म्हणणे चुकीचे...अॅड. दत्ता बनकर म्हणाले, ‘मंगळवार व मोती तळ्याचे पाणी पिण्याकरिता, धुण्याकरिता अथवा शेती, झाडांकरिता वापरले जात नाही. त्यामुळे या तळ्यांमध्ये मूर्ती विसर्जन करणे सोयीस्कर पडणार आहे. तसेच पालिकेची लाखो रुपयांची बचतही होणार आहे. मंगळवार तळे हे खासदार उदयनराजे भोसले यांच्या मालकीचे आहे. त्यांनी या तळ्यात विसर्जनाला परवानगी दिली आहे. मात्र, कोणत्याही बाबींची तपासणी न करता जिल्हाधिकाºयांनी या तळ्यात विसर्जनाला परवानगी नाकारली आहे. जिल्हाधिकाºयांचे हे म्हणणे चुकीचे आहे.सार्वजनिक विषयावर एकमतविसर्जन तळ्याच्या मुद्द्यावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये प्रथमच एकमत झाले. पुनर्विचार याचिकेचा ठराव संमत झाल्यानंतर सर्वांनी याचे स्वागत केले. नगराध्यक्षा माधवी कदम यांनी सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांचे कौतुक केले. तर नगरविकास आघाडीचे नगरसेवक अशोक मोने यांनी चांगल्या कामाला सैदव साथ राहील, असे सांगितले.