सातारा, दि. १४ : येथील मंगळवार तळ्यात शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास एका ४० ते ४५ वर्षीय व्यक्तीने उडी मारली. हा प्रकार तळ्याशेजारी असणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना बोलविण्यात आले.
मंगळवार तळ्यावर नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. शनिवारीही दुपारीही नागरिक आपपल्या कामामध्ये व्यस्त असताना अचानक एका व्यक्तीने मंगळवार तळ्यात उडी मारली.
हा प्रकार घडला त्यावेळी तळ्याशेजारी काहीजण गप्पा मारत उभे होते. त्यांना त्या व्यक्तीने तळ्यात उडी घेतल्याचे दिसले. त्यानंतर त्या युवकांनी आरडाओरड केली. त्यांच्या आवाजाने आजूबाजूचे लोक धावत आले.
मात्र, तोपर्यंत संबंधित व्यक्ती तळ्यात बुडाली होती. शाहूपुरी पोलिसांनाही याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. संबंधित व्यक्ती कोण होती, त्यांचे नाव काय? हे अद्याप पोलिसांनाही समजले नाही. तळ्यात त्या व्यक्तीचा शोध घेण्याचे दुपारपर्यंत सुरू होते.