सातारा : वर्षानुवर्षे मंगळवार तळ्यात साठलेला कचरा आणि मुर्ती विसर्जनाचा गाळ काढण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे तळ्याचे भक्कम बांधकाम आणि ऐतिहासिक बाज परिसरातील नागरिकांना खुणावू लागला आहे.पूर्वी शहराच्या मध्यवस्तीत राजवाड्यापासून काही अंतरावर मंगळवार पेठेत हे तळे आहे. ब्रिटिशकाळाच्या पूर्वार्धात साताऱ्याच्या छत्रपतींसाठी या तळ्याची निर्मिती करण्यात आली होती. या तळ्याची बांधणी औंधच्या पंतप्रतिनिधींनी केली होती. त्यामुळे पूर्वीचे लोक त्याला पंतांचे तळे असेही संबोधत होती. कालांतराने पेठेवरूनच या तळ्याला मंगळवार तळे असे नाव पडले. कास पाणी वितरण व्यवस्था आजच्या स्थापत्य शास्त्राला जितकी आव्हानात्मक आहे तशीच ती तळ्याचीही आहे. कारण तळ्यातून पाणी वितरणासाठी केलेल्या भुयारी व्यवस्था कोणाच्याही लक्षात येत नाही. सव्वाशे फुट लांब आणि तितक्याच रूंद असलेल्या चौकोनी तळ्याच्या चोहो बाजुंनी आत उतरत्या पायऱ्या आहेत. पश्चिमेच्या दगडी कमानीतून तळ्यात उतरता येते. पूर्वेस असलेल्या पायऱ्याही तळ्यात खोलपर्यंत जातात. या पाऱ्यांवरून पाण्याच्या पातळीपर्यंतच जाण्याची सोय करण्यात आली आहे. या तळ्याची खोली पन्नास फुट आहे. तळ्याच्या आतील बाजूस फिरता यावे म्हणून पूर्ण लांबीचे दोन कट्टेही तयार करण्यात आले आहेत.गेल्या काही महिन्यांपासून तळ्याच्या स्वच्छतेचे काम युध्दपातळवीर सुरू आहे. सुमारे ६०० डंपर गाळ काढण्यात आला आहे. हा गाळ काढल्यानंतर आकर्षक कमानींचे दर्शन खुप वर्षांनी समस्त सातारकरांना घडले आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारे आकर्षक आणि रेखीव बांधकाम हे या तळ्याचे वैशिष्ट्य आहे. (प्रतिनिधी)तरूणांना मोह फोटोग्राफीचामंगळवार तळ्याच्या स्वच्छतेनंतर तळे खुपच सुरेख दिसे लागले आहे. विशेषत: दगडी कमानी अनेकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. तळ्याची स्वच्छता सुरू असतानाही येथे काही युवा फोटोग्राफीसाठी येत असल्याचे पहायला मिळत आहे. आकर्षक कमानीची बॅकग्राऊंड घेवून काढण्यात आलेले फोटो अनेकांचे ‘डीपी’ झाले आहेत. या तळ्याचे हे सौंदर्य पुन्हा एकदा पहायला मिळाल्याने अनेक ज्येष्ठही सुखावले आहे.
मंगळवार तळ्याचा ऐतिहासिक बाज!
By admin | Published: February 24, 2015 10:41 PM