फलटण : ऊन, पाऊस, वारा झेलत. ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या फलटण शहरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्याचे उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. माउली माउलीच्या गजराने फलटणनगरी दुमदुमली.फलटण शहराच्या प्रवेशद्वारावर भोसले वस्तीनजीक नगराध्यक्षा नीता नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे त्यांचे सहकारी नगरसेवक, मुख्याधिकारी धैर्यशील पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे यांच्यासह शहरवासीयांनी माउलींचे स्वागत केले. त्यावेळी नगरपरिषदेने स्वागतासाठी उभारलेल्या कमानीवरून माउलींवर पुष्पवृष्टी केली.तरडगाव येथून रविवारी सकाळी सहा वाजता फलटणकडे मार्गस्थ झाला. काळज येथील दत्त मठात माउलींच्या पादुकांना अभिषेक केला. आरती झाल्यानंतर पादुका पुन्हा पालखीत ठेवण्यात आल्या. परिसरातून आलेल्या भाविकांनी माउलींचे दर्शन घेतले. सुरवडी येथे सोहळा थांबल्यानंतर ओट्यावर पालखी ठेवण्यात आली. तेथे पंचायत समिती सभापती रेश्मा भोसले, न्यू फलटण शुगर वर्क्सचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक प्रल्हादराव साळुंखे-पाटील, सरपंच जितेंद्र साळुंखे-पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी दर्शन घेतले. स्वराज दूध प्रकल्पासमोर कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या जिजामाला नाईक-निंबाळकर यांनी स्वागत केले.त्यानंतर सोहळा निंभोरे ओढा येथे थांबला. दोन तासांच्या येथील वास्तव्यात पालखी ओट्यावर ठेवण्यात आली. तेथे सरपंच सुरेखा अडसुळ त्यांचे सहकारी, ग्रामस्थांनी माउलींचे दर्शन घेतले. त्यानंतर वडजल येथील ग्रामस्थांनी दर्शन घेतल्यानंतर सोहळा फलटणकडे मार्गस्थ झाला. तांबमाळ परिसरात तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार यांनी माउलींचे स्वागत करून दर्शन घेतले.फलटण वेशीवर नगरपरिषदेच्या वतीने पालखीचे स्वागत केले. त्यानंतर सोहळा महतपुरा पेठ, सद्गुरू हरिबुवा महाराज मंदिर, पाचबत्ती चौक, छत्रपती शिवाजी वाचनालयमार्गे मुधोजी मनमोहन राजवाडा आणि श्रीराम मंदिराजवळ पोहोचला. तेथे नाईक-निंबाळकर देवस्थान ट्रस्ट आणि राजघराण्यातर्फे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर यांनी स्वागत केले. सोहळा जब्रेश्वर मंदिर, गजानन चौक, महात्मा फुले चौक, अधिकारगृह इमारत, गिरवी नाका, शहर पोलीस ठाणे या मार्गाने विमानतळावरील प्रशस्त पालखी तळावर पोहोचला. तेथे समाज आरती होऊन माउलींचा सोहळा मुक्कामासाठी विसावला.माउलींचा आज बरडला मुक्कामदरम्यान, पालखी सोहळ्याचा एक दिवसाचा मुक्काम झाल्यानंतर सोमवार, दि. १६ रोजी पालखी सोहळा बरडकडे प्रस्थान करणार आहे. त्यासाठी सोमवारी सकाळी सहा वाजता बरडकडे मार्गस्थ करणार आहे.
टाळ मृदंगात दुमदुमली फलटणनगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 10:51 PM