पळशी : माण तालुक्यातील शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या यात्रेस शनिवार, दि. १७ पासून हळदी समारंभाने प्रारंभ झाला. कोरोनामुळे भविकांविना केवळ मोजक्याच देवस्थानच्या सेवाधारी व मानकरींच्या उपस्थितीत हळदी समारंभ पार पडला.
प्रतिवर्षी चैत्रशुद्ध पंचमी ते पाैर्णिमा या काळात शंभू महादेव यात्रा पार पडत असते; पण कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही यात्रा भविकांविनाच पार पडत आहे. गर्दी न करता यात्रा उत्सवातील सर्व धार्मिक विधी स्थानिक सेवाधारी व मानकरींनी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर वधू-वरांकडील ब्राह्मण, जंगम, घडशी, गुरव, कोळी, बडवे व वाघमोडे अशा मोजक्याच सेवाधारी व मानकरीच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी ६ वाजता महादेव मंदिरात हळदी सोहळा पार पडला. यावेळी शिवपार्वती व विष्णू लक्ष्मी शिवलिंगाची विधिवत पूजा करून हळद लावण्यात आली. याचबरोबर कोरोनाचे जागतिक संकट दूर व्हावे, असेही साकडे घालण्यात आले.
यात्रा काळात जमावबंदी आदेश लागू असल्याने गर्दी होऊ नये, यासाठी मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रा काळात २७ एप्रिलअखेर बाहेरील व्यक्तींना शिंगणापूरमध्ये येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.